मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणीची हत्या.

मुंबई;- च्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणीची हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. गोरेगावच्या बांगुरनगर परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या पाठीमागे हा खळबळजनक प्रकार घडला. दोघांचीही ओळख पटली असून रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

मुंबईत मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून गोळीबार झाल्याची घटना घडली. मालाड पश्चिम येथे लिंक रोडवर इन्फिनिटी मॉलच्या जवळ गोळीबार झाला. एकतर्फी प्रेम करणाऱ्या 27 वर्षांच्या तरुणाने नकार सहन झाला नाही आणि 22 वर्षांच्या तरुणीवर गोळीबार केला. ही घटना सोमवारी 4 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. तरुणाने आधी तरुणीवर गोळीबार केला, नंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने दोघांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

गोळीबारामुळे परिसरात पसरले भीतीचे वातावरण

गोळीबाराचा आवाज ऐकल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. एका व्यक्तीने प्रसंगावधान राखून 100 क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस पोहचण्याआधीच गोळीबारामुळे तरुण आणि तरुणी गंभीर जखमी झाले होते.

गोळीबार प्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाणे करत आहे तपास

गोळीबार प्रकरणात बांगुरनगर पोलीस ठाणे तपास करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात ठार झालेली तरुणी मालाड पूर्व भागातील रहिवासी होती. तरुणीचे काही दिवसांपूर्वी दुसऱ्या तरुणाशी लग्न झाले होते. लग्न झाले असल्यामुळे तरुणीने तरुणाला नकार दिला. हा नकार सहन झाला नाही आणि कांदिवलीच्या लालजीपाड्यात राहणाऱ्या तरुणाने गोळीबार केला.

हिस्टरीशीटर तरुणाने एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यानंतर केला गोळीबार

गोळीबार करणारा तरुण हिस्टरीशीटर होता, त्याच्या नावावर याआधीही काही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती बांगुरनगर पोलिसांनी दिली. तरुणावर आधी दरोडा, खंडणी वसुली अशा स्वरुपाच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

इन्फिनिटी मॉलच्या मागील बाजूस घडली घटना

गोळीबाराची घटना इन्फिनिटी मॉलच्या मागील बाजूस गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर (मार्गिका / लेन) घडली. या गोळीबारासाठी तरुणाने वापरलेले देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि गोळ्या कुठून आणल्या याचा शोध सुरू आहे. तरुण हिस्टरीशीटर असल्यामुळे त्याने आधीच बेकायदा पद्धतीने देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि गोळ्या मिळवून त्यांचा इतर गु्ह्यांमध्येही धमकावण्यासाठी वापर केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी गोळीबारासाठी वापरलेले देशी रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. दोन्ही मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवण्यात आले.

मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाला दिली भेट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. तसेच आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासकामाचा आढावा घेतला. तपास अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here