…अन्यथा २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करु: आमदार सुधाकर अडबाले
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830856351
चंद्रपूर, 7 सप्टेंबर: जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. चंद्रपूर यांच्या कक्षात आमदार तथा विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत बैठा सत्याग्रह करण्यात आला. प्रलंबित समस्या २५ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा अन्यथा २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिला.
• शिक्षण विभागास २५ सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम
• ‘विमाशि’ संघाचा शिक्षक दिनी ‘बैठा सत्याग्रह
जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ २४ मे २०२३ राेजी सहविचार सभा घेण्यात आली होती. त्यात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आलेले नाही. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कक्षात बैठा सत्याग्रह केला. यावेळी जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण यांनी २५ सप्टेंबरपर्यंत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर सत्याग्रह मागे घेण्यात आला. २५ सप्टेंबरपर्यंत प्रकरणे निकाली न निघाल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिला. सोबतच शिक्षण विभागात प्रकरणे निकाली काढण्यात अनियमितता होत असल्याने पेंशन केस, मेडीकल बिल, निवड/वरिष्ठ श्रेणी व इतर प्रकरणांचा निपटारा टोकन पध्दतीने करण्यात यावा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.
या बैठा सत्याग्रहास महा. राज्य माध्य. शिक्षक महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंटीवार, दीपक धोपटे, शालीक ढोरे, नितीन जीवतोडे, मारोतराव अतकरे, प्रकाश कुंभारे, शहर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, शकील सर, किंदरने, काळे, एम.एम. मिलमिले, विजय भोगेकर, सुरेश गिलोरकर, विनायक देठे, भालचंद्र धांडे, विनोद कौरासे, सतीश अवताडे, प्रमोद पेद्दीलवार, बंडू वांढरे, खडसे, चापले यांच्यासह समस्याग्रस्त शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठा सत्याग्रहातील मागण्या
वादग्रस्त चिमूर एज्यूकेशन सोसायटी द्वारा संचालित एकूण ५ नेहरू विद्यालयात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदावर रिक्त पदी पदोन्नती देण्यात यावी, मागील अनेक दिवसांपासून सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित उपदानाची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी, प्रलंबित निवड श्रेणीची प्रकरणे निकाली काढावी, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त रफी अहमद किदवाई हायस्कूल व इतर शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्ताव निकाली काढावे, प्रलंबित मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदाच्या मान्यता, अनुकंपा प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात याव्या व अन्य मागण्यांचा समावेश आहे.