आता त्या हत्तीचा सिंदेवाही तालुक्यात धुमाकूळ सुरू…

58

आता त्या हत्तीचा सिंदेवाही तालुक्यात धुमाकूळ सुरू, शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351

सिंदेवाही /चंद्रपूर: ओडीसा राज्यातून छत्तीसगड महाराष्ट्रात दाखल झालेल्या नर हतीचा मुक्काम सध्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात असल्याचे कळते. ओडीसा राज्यातून आलेला नर हत्ती गडचीरोली जंगल मार्गे वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रह्मपुरी नंतर सावली, नागभीड तालुक्यातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत आहे. हा नर हत्ती आता नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी परीसरातुन सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार जंगलात दाखल झाला आहे.

सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार या गावात मागील दोन ते तीन दिवसांपासून या हत्तीने शेतशिवारात थैमान घातले आहे. यात कच्चेपार येथील जंगलालगतच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या हत्तीने रात्रीच्या सुमारास जंगलालगत असलेल्या 20 शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकांचे नुकसान केले असल्याची घटना 12 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. या हत्तीने कच्चेपार येथील देविदास आत्राम यांच्या शेतातील एक विद्युत खांब सुद्धा पाडला होता. शेतातून हत्ती पिके तुडवित असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.

• सिंदेवाही तालुक्यातील जंगलात चार पाच दिवसापासून हत्तीचा मुक्काम 

• शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

त्यानंतर हत्तीने आपला मोर्चा मरेगाव धानोरा मार्गे लोनखैरी या गावाकडे वळविला. दुसर्‍या दिवशी हत्तीने परतीचा प्रवास करीत चिकमारा – गुंजेवाही जंगलाकडे मार्गक्रमण सुरू केले असून आज सकाळी पवनपार जंगलातून जात असल्याने तो परतीला जात असल्याचे दिसुन येत आहे, हा परिसर ऐकारा भुज जंगलाला लागुन आहे. त्यामुळे हा नर हत्ती आता आपला मोर्चा कोणाकडे वळविनार हा एक मोठा प्रश्न आहे.

हत्तीने आजपर्यंत केलेल्या शेत नुकसानीची भरपाई वनविभागातर्फे देण्यात यावी व वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सध्या हत्ती आपला प्रवास रात्रीच्या सुमारास करत असल्याने हत्तीचा कोणताही त्रास होताना दिसुन येत नाही आहे यामुळे कुठलीही जिवीत हानी झाली नाही हे विशेष.

The Biggest Amazon SALE LIVE Now…Click On The Banner To Get Discount Up To 50%

हत्तीच्या नियंत्रणासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. हतीच्या दहशतीत राहण्याची गरज नसून अजूनपर्यंत मनुष्यावर हल्ला केल्याचे दिसत नाही. केवळ हत्तीला बघण्याची गर्दी करत असताना सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाले असल्यास वनकर्मचाऱ्यांकडे अर्ज द्यावे, पंचनामे तत्काळ भरून नुकसान भरपाई देण्यात येईल असे विशाल सालकर वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही यांनी सांगितलं.