पाडळी – जानोरी मार्गावरील सुवर्णमय रंगाने लक्ष वेधले जाणारे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

50

पाडळी – जानोरी मार्गावरील सुवर्णमय रंगाने लक्ष वेधले जाणारे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

मीडियावार्ता 

इगतपुरी प्रतिनिधी: इगतपुरी तालुका पर्यटनस्थळ व अध्यात्मिक क्षेत्र म्हणून नावलौकिक आहे. अनेक धार्मिक स्थळांमुळेही तालुक्याला विशेष असे महत्व प्राप्त आहे . त्यातच नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी देशमुख जवळील जानोरी रस्त्यावर असलेले श्री सिद्धीविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. ट्रस्टचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले श्री सिद्धिविनायक गणेशाचे प्रेरणादायी मनमोहक, आकर्षक व निसर्गरम्य वातावरणात असलेले मंदिर गणेशोत्सव काळात हा परिसर भाविक भक्तांच्या वर्दळीने भरून जातो.

महामार्ग व दोनही बाजुंनी लोहमार्ग यांच्या मध्यावर व निसर्गरम्य परिसराने नटलेल्या जानोरी मार्गावरील या सुवर्णमय रंगाने लक्ष वेधले जाणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणेश दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. या आकर्षक व मनमोहक मंदिरामुळे इगतपुरी तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात नामांकित व्यक्तिमत्त्व संजय अनंत तुपसाखरे यांनी आपल्या पाडळी जानोरी शिवारातील स्वतःच्या शिवारात श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर व मूर्तीची स्थापना केली आहे. मुंबईच्या सिद्धिविनायकाचे प्रतिरूप हे या ठिकाणच्या सिद्धिविनायक गणेशाच्या दर्शनरुपात पहावयास मिळते याचे गणेश भक्तांना समाधान आहे.

तुपसाखरे परिवाराने अशा निसर्गरम्य परिसरात श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराची उभारणी करून इगतपुरी तालुक्यात तसेच परिसरातील नागरिकांना मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणेशाचे दर्शन घडविले. या मंदिराची आकर्षक रचना, मूर्ती व निसर्ग सौंदर्याचा ठेवा पहाताच गणेश भक्तांचे मन भारावून जाते. वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थी, प्रत्येक मंगळवार, गणेशजयंती, अंगारकी चतुर्थी, गणेशोत्सव आदी कालावधीत “श्री” च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या गणेशोत्सव काळात महायज्ञ, महागणेशयाग, महापूजा, “श्रीं” ची पालखीतून सवाद्य मिरवणूक तसेच पालखीसोहळा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाआरती नंतर महाप्रसदांचेही आयोजन करण्यावर आले आहे.

श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिरामुळे दिवसागणिक भक्तांची अलोट गर्दी होत आहे. हे आता महाराष्टातील श्रद्धास्थान बनत आहे. इगतपुरी तालुक्याचे मोठे तीर्थ क्षेत्रं झाले आहे. मुंबई, नाशिक,पुणे,जळगाव,धुळे, अहमदनगर या जिल्ह्यातून नियमित भक्त येतात, चतु्थीनिमित्त येथे भव्य गर्दी होत आहे. हा महागणपती निश्चित पावतो येथे येणारा भक्त कधी खाली हात जात नाही आसी श्रद्धा व अनुभव आहे. या शुभ मुहूर्तावर मुख्य विश्वस्त संजय अनंत तुपसाखरे यांच्या सुमधर आवाजातील ” सिद्धिविनायक मोरया, महागणपती मोरया” हे सुंदर गजर भक्ती गीत प्रसारित होणार आहे ,हे गीत सर्व भक्तांनी दहादिवस गणपतीच्या आरती आगोदर वाजवल्यास निश्चितच फलश्रुती व सिद्धीविनायकचा आशीर्वाद पावेल आशी श्रद्धा आहे.