रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक घट, एका वर्षांत तीन हजाराने घटली पटसंख्या, रायगडातील ३७ शाळांची झाली घट
रत्नाकर पाटील
अलिबाग प्रतिनिधी
इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागली आहे. 2022 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या दोन हजार 603 शाळांवर तब्बल सहा हजार 103 शिक्षक कार्यरत होते. पण, सद्य:स्थितीत दोन हजार 795 शाळांमध्ये पाच हजार 925 शिक्षक आहेत. एका वर्षांत तब्बल तीन हजार 155 विद्यार्थी कमी झाल्याने 37 शाळा आणि 228 शिक्षक थेट कमी झाल्याची वस्तुस्थिती बिंदुनामावली अंतिम करताना समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदवीधर शिक्षक व उपशिक्षक यांच्यातून केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी अशा पदोन्नती मिळते. उर्वरित कार्यरत शिक्षक कोणत्या जातसंवर्गातील आहेत, कोणत्या जातसंवर्गाची पदे आरक्षणानुसार कमी आहेत, याची पडताळणी करून बिंदुनामावली अंतिम केली जाते. गेले दोन महिन्यांपासून त्यावर रात्रंदिवस काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी यांच्या कार्यलयात युद्धपातळीवर बिंदुनामावलीची कार्यवाही सुरू होती. शिक्षक मान्यतेचे आदेश मिळाले नसल्याने बिंदुनामावली रखडली होती. आता बिंदुनामावली अंतिम करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या दरबारात आहे.
बिंदुनामावली रखडल्याने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदभरती लांबणीवर गेली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक नाहीत, असे चित्र आहे. दरम्यान, 2021-22च्या तुलनेत मागच्या वर्षी पटसंख्या पुन्हा कमी झाली असून, त्याचा फटका आता नवीन शिक्षक भरतीत निश्चितपणे बसणार आहे. आता आधार निकषानुसार संचमान्यता होत असल्याने ज्यांचे आधारकार्ड प्रमाणीकरण झाले, तेवढीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे काहीजण अतिरिक्त होतील आणि रायगड जिल्हा परिषदेला केवळ 500 शिक्षकांचीच भरती करता येईल, अशी स्थिती आहे.
झेडपी शाळांमध्ये 500 शिक्षकांची भरती!
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली आता अंतिम टप्प्यावर आहे. मागासवर्गीय कक्षाकडून त्यास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास 500 शिक्षकांची भरती होईल, असा विश्वास प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे