क्षमा करा बाबासाहेब…
क्षमा करा बाबासाहेब
तुमचं लोकशाहीच स्वप्न भंगलं
येथे पुढार्यांच्या पोरांचे
आहे बघा चांगभलं..!
बाप खासदार,पोरगा आमदार
बायको झेडपीची उमेदवार
सुनबाईच्या गळ्यातही
पंचायतच्या सभापतीचा हार..!
कार्यकर्त्याच्या वाट्याला फक्त
होर्डींगवरची जागा
पद प्रतिष्ठेचा विषय आला की
नेहमिच दिला जातो दगा..!
नेत्याच्या जयकारासाठी
कार्यकर्ता जोमात फिरतो
खुर्च्या अन् सतरंज्या उचलत
निष्ठेचं प्रदर्शन करतो…!
संसारावर तुळशीपत्र ठेवून
पक्षाशी प्रामाणिक राहतो
आयुष्य वाहतो पक्षासाठी
युवा नेत्याचा भावी सरपंच होतो..!
स्वार्थासाठी पुढारी इकडे
क्षणात दुसरा झेंडा धरतो
कार्यकर्त्यांचा भावनांचा
इकडे लिलाव करतो..!
कार्यकर्त्यांनो सावध व्हा
काळ फार वाईट आला
पुढार्यांच्या वारसापुढं
शुन्य किंमत तुमच्या कर्तुत्वाला..!
शेवटी कार्यकर्त्याच्या आयुष्यात
कोणताच बदल होत नाही
जिकडे तिकडे फक्त घराणेशाही
बाबा खरच हरवली हो लोकशाही..!
कवी- मारुती खुडे गुरुजी.
श्रीक्षेत्र माहूर. जि.नांदेड
संकलन….. गोपाल नाईक
युवा पत्रकार नांदेड.
मो.7499854591.