जिल्ह्यात १ ऑक्टोंबर रोजी श्रमदान मोहीम, रायगड जिल्हा परिषदचा उपक्रम

56

जिल्ह्यात १ ऑक्टोंबर रोजी श्रमदान मोहीम, रायगड जिल्हा परिषदचा उपक्रम

रत्नाकर पाटील

अलिबाग प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक तास श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छ्ता अभियान राबविण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबवून महात्मा गांधीजींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. श्रमदान मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात गावागावात सार्वजनिक परिसर, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, मंदिरे, बाजार, बस स्थानक, समुद्रकिनारे, नदी किनारी, तलाव ठिकाणी तसेच इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेसाठी जागा निवडतील. ही सर्व ठिकाणे नकाशावर उपलब्ध असतील, जी https://swachhatahiseva.com या सिटिझन पोर्टलवर उपलब्ध पर्यायांद्वारे पाहता येतील आणि निवडता येतील. याद्वारे नागरिक स्वच्छता अभियानाच्या ठिकाणी त्यांचे फोटो क्लिक करू शकतील आणि ते या पोर्टलवर अपलोड करू शकणार असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली आहे.