जिल्ह्यातील एक ऑक्टोबर रोजी लोकसहभागातून स्वच्छता अभियान
✍️विवेक काटोलकर ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞77989 23192📞
माणगांव :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबविण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका ग्रामपंचायत आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी लोकसहभागातून उपक्रम हाती घेण्यात आला आहे यामध्ये स्वच्छतेसाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी , शासकीय अधिकाऱ्यांची व्हिसीद्वारे ऑनलाईन बैठक झाली.
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे म्हणाले जिल्ह्यातील अनेक उपक्रम लोकसहभागातून यशस्वी झाले असून स्वच्छता अभियान शासन, संस्था व लोकसहभागातून यशस्वी होईल . जिल्ह्यात विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविले जात असून माझी माती माझा देश या उपक्रमाची देखील अंमलबजावणी सुरू आहे. उपक्रमांसाठी होणाऱ्या नियोजन आणि शासकीय विभागांच्या कार्यवाहीतून जिल्ह्यात चांगले काम होईल असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड म्हणाले, या मोहिमेमध्ये प्लास्टिक कचरा इलेक्ट्रॉनिक कचरा देखील एकत्रित केला जावा नगरपालिका व ग्रामपंचायतीमधील बाजारपेठ मैदान पर्यटन स्थळ येथील कचरा काढला जावा , असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर पर्यंत हे अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, अधिकारी ,कर्मचारी , एन एस एस , एन सी सी, बचत गटांच्या सदस्य ,अंगणवाडी सेविका , आशा सेविका,विद्यार्थी यासह लोकसहभागातून ही मोहीम लोक चळवळ बनविण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.
शासकीय कार्यालयांच्या स्तरांवर देखील स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता केली जावी तालुकास्तरावर तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी यांनी एकत्रित यासाठी नियोजन करावे. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या विभागात माझी वसुंधरा उपक्रमाचा देखील यामध्ये सहभाग असावा अशा सूचना केल्या आहेत.
*अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कायम राहण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबविण्यात येणार आहे .
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा,
नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरचा भागात नेहमी कचऱ्याचे ढीग, डेब्रीज टाकलेले असते. अशा महापालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबवावी असे यानिमित्ताने आवाहन केले आहे .
‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्वाचे आहे. स्वच्छता फक्त कागदावर ठेऊ नका. प्रत्यक्ष फिल्डवर त्याचे काम दिसले पाहिजे. या उपक्रमात आपण १ ऑक्टोबरला आपापल्या गावात, शहरात, प्रत्येक वार्डात, प्रत्येक क्षेत्रात सकाळी १० वाजेपासून स्वच्छता मोहीम राबवावी. प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी आणि ग्रामपंचायतीत एका ठिकाणी मोहीम राबविताना त्या त्या भागातील सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावे, जिथे खरोखरच कचरा आहे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहे, अशा जागा शोधून काढा,हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कायम राहण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ‘मिशन मोड’वर काम करावे असे बैठकीत सांगण्यात आले.