शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने अखेर त्या हत्तीचा मृत्यू
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
सिंदेवाही/चंद्रपूर: मागच्या अनेक दिवसांपासून सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील जंगल व लागून असलेल्या शेतशिवारांत भटकणाऱ्या ‘त्या’ एकाकी हत्तीचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील चिटकी शेतशिवारात मंगळवार 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली. हा हत्ती काही दिवसांआधी ओडिसा राज्यातून आलेल्या आपल्या कळपामधून वेगळा झाला होता.
शेतामध्ये जंगली श्वापदांकडून होणाऱ्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी परीसरातील शेतकरी शेतकुंपनांना विद्युत करंट लावतात. अशाच एका शेतानजीक गेल्याने आणि विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने उपक्षेत्र तांबेगडी मेंढा अंतर्गत येणाऱ्या मुरपार बीटामधील चिटकी गावातील शेतशिवारात आज सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास या एकाकी हत्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.