श्रीनगर जेलमधील सेटिंगमुळेच नवीद पळाला

53

मीडिया न्यूज़ वार्ता

श्रीनगर :श्रीनगरच्या सेंट्रल जेलचं प्रशासन आणि दहशतवाद्यांमधील सेटिंगमुळेच लश्कर-ए-तोयबाचा अतिरेकी नवीद जट पळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीनगरच्या या जेलमध्ये दहशतवाद्यांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना मोबाइल आणि इंटरनेटची सुविधा दिली जाते. शिवाय, खास काश्मिरी ‘वाजवान’ मटणाचा खुराकही पुरविला जातो. त्यामुळं श्रीनगर सेंट्रल जेल दहशतवाद्यांसाठी जणू स्वर्गच बनला असल्याचं समोर आलं आहे.

मन्सूर अहमद नावाचा एक फार्मासिस्ट गेल्या दहा वर्षांपासून इथे काम करतो. त्यामुळे त्याचे दहशतवाद्यांशी चांगले संबंध झाले आहेत. उपचाराच्या निमित्ताने दहशतवाद्यांना श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम तो करतो. त्याशिवाय डॉ. झीनत निजामी हा वैद्यकीय अधिकारीही ३० वर्षांपासून सेंट्रल जेलमध्ये काम करतो. त्याच्या सांगण्यावरूनच नवीद जट आणि अन्य पाच कैद्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्यासोबत डॉक्टर सज्जाद अहमदला पाठवले होते. पण आजारी असल्याचं कारण दाखवून त्याने जाण्यास नकार दिला. या सर्व प्रकारामुळे दहशतवादी नवीदला पळवून नेण्यात यशस्वी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळेच नवीद तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. सखोल चौकशीत या संपूर्ण बाबी समोर येतीलच, असंही हा अधिकारी म्हणाला. दरम्यान फार्मासिस्ट मन्सूर अहमद आणि डॉ. झीनत यांना निलंबित करण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.