वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे केव्हा भरणार..?
✍🏻गोपाल नाईक✍🏻
श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी..
मो.7499854591
श्रीक्षेत्र माहूर : महाराष्ट्रातील शासकिय दवाखान्याचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत.राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे व औषधाचा तुटवडा या गंभिर प्रश्नामुळे होत असलेले रूग्णांचे हाल सद्या चर्चेचा विषय बनले आहेत.ही बाब अतिशय गंभीर असून अनेकांना आपले प्राण उपचाराविणा गमावण्याची वेळ आली आहे.खरतर हे सरकारचे अपयश आहे.एकीकडे राजकारणात मश्गुल असलेल्या राजकर्त्यांना जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.त्यामुळे राज्यभर आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत.
माहुर तालुक्यातील वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त आहेत.त्यामुळे या परिसरातील आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे.रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.वानोळा येथे वैद्यकिय अधिकारी गट ( ब) तसेच कुपटी,पाचुंदा व पानोळा उपकेंद्रात सि.एच.ओ चे पदे रिक्त आहेत.याचा परिणाम वानोळा आरोग्य केंद्रातील सद्यस्थितीतील उपलब्ध कर्मचारी वर्गावर पडत आहे.अतिरीक्त भार या उपलब्ध कर्मचार्यावर पडत असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.वेळेवर उपचार मिळत नसल्याने नागरीकांना खाजगी दवाखान्यातच रुग्णावर उपचार करुण घेण्याची वेळ आली आहे.वानोळा परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदयाचे वास्तव्य असून त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असते.त्यात हा खाजगी औषधोपचाराचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.शासनाने व आरोग्य प्रशासनाने वेळीच या प्रश्नाकडे जातीने लक्ष देवून सदर रिक्त पदे तातडीने भरावेत व येथिल आरोग्य यंत्रणा सुरळीत करावी अशी या परिसरातील नागरीकांची मागणी आहे.काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन या समस्येविरुद्ध तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.