सरदार पटेल महाविद्यालयात तृतीय पदवी वितरण समारंभ व गुणवंतांचा गौरव
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर, 21 ऑक्टोंबर: अब्राहम लिंकन हे सुरुवातीस अनेक वेळा निवडणुकीत पराभूत झाले. पण पराभव आणि अपयश स्वीकारण्याची अनेक उदाहरणे त्यांच्याकडे होती. त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या कल्पकतेने आणि चिकाटीने ते महाशक्तीशाली अमेरिका देशाचे महान राष्ट्रपती बनले असे सांगत अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी येथील सरदार पटेल महाविद्यालयातील स्व. शांताराम पोटदुखे सभागृहात आयोजित तृतीय पदवी वितरण समारंभ व गुणवंत गौरव सोहळ्यात बोलताना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा शांताराम पोटदुखे या होत्या. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, सदस्य जिनेश पटेल, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्याम धोपटे, प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर, गोंडवाना विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.जयेश चक्रवर्ती, संजय रामगिरवार,डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वोदय शिक्षण मंडळातर्फे डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांनी यश मिळविणे सोपे,पण टिकविणे कठीण असल्याचे नमूद करीत महाविद्यालयाच्या यशाबद्धल समाधान व्यक्त केले.
• अपयश ही यशाची पहिली पायरी – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. काटकर यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत या यशात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसोबतच संस्थेचाही महत्वाचा वाटा असल्याचे नमूद केले केले. माजी विद्यार्थी संघातर्फे प्राचार्य शाम धोपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठातर्फे उत्कृष्ठ अधिसभा सदस्य म्हणून पुरस्कृत झाल्याबद्दल संजय रामगिरवार यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी माधुरी कटकोजवार हिने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ६३ गुणवत्ता यादीत समाविष्ट व सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्व.महेंद्र ओंकारनाथ शर्मा शिष्यवृत्ती व स्व. रमादेवी ओंकारनाथ शर्मा शिष्यवृत्ती माधुरी कटकोजवार यांना तर ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये सहभागी चार विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी संघातर्फे १४ विद्यार्थी तर महाविद्यालयातील प्राध्यापकांद्वारे प्रायोजित ५३ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. महेंद्र बेताल व प्रा. स्नेहल रायकुंडलिया यांनी, तर आभार प्रदर डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी मानले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार,उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहरराव तारकुंडे, सदस्य सगुणा तलांडी, राकेश पटेल, जिनेश पटेल, आ.किशोर जोरगेवार, संदीप गड्डमवार, सुधाकर पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.