शासनाची चौकशी समिती वरोड्यात दाखल
• कांदा अनुदान घोटाळा प्रकरण
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
वरोडा : 26 ऑक्टोबर
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अनुदान वितरणाबाबत झालेल्या अनियमिततेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नेमलेली पाच सदस्य चौकशी समिती वरोड्यात दाखल झाली.
प्रत्यक्षात कांद्याची लागवड न करताच अनेक शेतकर्यांच्या बँक खात्यात 2 कोटी 30 लाख 8 हजार 290 रुपये अनुदान 676 शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले आणि लाल कांदा घोटाळा उजेडात आला होता. या संदर्भात लाभार्थींच्या पीक पेर्यावर कांद्याच्या पिकाची नोंदच नसल्याचा अहवाल समोर आला असता एकच खळबळ उडाली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने कांदा घोटाळ्याच्या अनियमिततेची सखोल चौकशी करण्यासाठी सहसचिव (पणन) डॉ. सुग्रीव धपाटे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य असलेली समिती नेमली. ही समिती बुधवारी वरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धडकली. पहिल्याच दिवशी अनुदान घोटाळ्याच्या निषेधार्थ बाजार समिती पुढे फलक लावण्यात आले होते. बुधवार आणि गुरुवारला या समितीने तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि बाजार समितीचे अधिकारी तसेच कर्मचारी यांचेसह या अनुदान घोटाळ्याची तक्रार करणार्या संचालकांची चौकशी केली. यावेळी कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याचे कळले. तसेच अनेक अधिकार्यांच्या बयाणांमध्ये विसंगती आढळून आल्याचेही निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. सुग्रीव धपाटे तभाशी बोलताना म्हणाले, दोन दिवस चाललेल्या चौकशी दरम्यान यातील सर्व संबंधित घटकांची चौकशी करण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हा अहवाल शासनाकडे लवकरच सादर करण्यात येईल. त्यानंतर यातील दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता या घोटाळ्यातील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.