मध्यरात्री दोन वाजता गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाब्या ताब्यात घेत पाच लाख 75 हजारांच्या रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिने लंपास.

समुद्रपूर:- तालुक्यातील मांडगावात घर मालकाच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाब्या ताब्यात घेत पाच लाख 75 हजारांच्या रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिने लंपास करीत सशस्त्र दरोडा टाकला. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडगाव येथील महादेवराव यादवराव पिसे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरांनी गळ्यावर चाकू ठेवून कपाटाच्या चाब्या हिसकावल्या. कपाटात ठेवलेले चार लाख रुपये रोख आणि साडेतीन तोळे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लक्ष ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. महादेव पिसे घाबरून बेशुद्ध होत पलंगावर पडले. एका तासानंतर त्यांना शुद्धी आल्यावर घटनेची माहिती घरच्या सदस्यांना दिली. शेजाऱ्यांच्या आणि पोलिस पाटलाच्या मदतीने हिंगणघाट पोलिसांना घटनेची माहिती दिली.

महादेव पिसे अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांना विकास आणि आकाश असे दोन मुलं आहेत. दोन्हीही मुलं जामच्या पीव्ही टेक्स्टाईलमध्ये काम करतात. लहान मुलगा आकाशचे लग्न 28 जानेवारीला असल्याने लग्नासाठी खरेदी व अन्य आवश्यक कामासाठी महादेवराव यांनी बँकेतून व शेतमाल विकून एकूण चार लाख रुपये रोख जमा करून कपाटात ठेवले होते. तर सोन्याचे साडेतीन तोळे दागिन्यांचा समावेश होता. रात्री दोनच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे घराजवळ लपून बसून होते.

महादेवराव लघुशंकेसाठी घराच्या मागच्या दारातून निघताच दोन्ही चोरटे घरात घुसले. महादेवराव घरात आल्यावर तोंडावर मास्क बांधून असलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने चाकू काढून महादेवराव यांच्या गळ्याला लावला. कपाटाची चाबी न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. चाकूच्या धाकाने चाबी  हस्तगत करून दुसऱ्या चोरट्याने कपाटात असलेले चार लाख रुपये व साडे तीन तोळे सोन्याचे दागिने हे सर्व बॅगमध्ये भरून जवळपास अर्ध्या तासात चोरटे घटनास्थळावरून फरार झाले.

चाकू पाहून शुद्ध हरवली

चाकू पाहून महादेवरावने आपली शुद्ध हरवली होती. ते बेशुद्ध होऊन पलंगावर पडून होते. जवळपास एका तासानंतर त्यांना शुद्धी आल्यावर घटनेबद्दल घरच्या लोकांना सांगितले. त्यानंतर आजूबाजूला व पोलिस पाटलाच्या मदतीने हिंगणघाट पोलिसांना या संबंधाचे सूचना देण्यात आली. घटनेच्या वेळी  यादवरावांचा एक मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच घटनेच्या तपासासाठी वर्धेवरून ठसे तज्ञ व इतर विशेष ज्ञ यांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले आहे.

दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

या घटनेमुळे मांडगाव गावात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेले, ठाणेदार संपत चव्हाण व वर्धेवरून वरिष्ठ पोलिस अधिकारी बीट जमादार संदीप मेंढे, नितीन तोडासे घटनास्थळी पोहोचले. या घटनेबद्दल हिंगणघाट पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासात पोलिस पथक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here