भंडारा, गोंदिया , नागपूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणारा आरोपी अखेर अटक
लपविलेल्या बनावटी नंबरच्या १२ दुचाकी विक्रीआधीच जप्त करून स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी भंडारा , गोंदिया , नागपूर या तिनही जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ मोटार सायकलींसह एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १६ डिसेंबर रोजी करण्यात आली. राहुल ऊर्फ चंगा सुखचांद लिल्हारे वय (२१) वर्षे रा. अंगुर बगिचा गोंदिया याला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बाम्हणी येथे अटक केली आहे. त्याने तिरोडा तालुक्यातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आल्याने त्याला तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटार सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना १६ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा येथील दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल चोरणारा आरोपी राहुल ऊर्फ चंगा लिल्हारे रा. अंगुर बगीचा गोंदिया हा असल्याचे समजताच त्याची मािहती काढून भंडारा जिल्ह्याच्या बाम्हणी येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने १२ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्या मोटारसायकलींची किंमत ४ लाख ८८ हजार रुपये असून माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तूरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, सुजीत हलमारे, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, संतोष केदार, तिरोडाचे पोलीस निरीक्षक, देविदास कठाडे, पोलीस उपनिरीक्षक पुंडे, पोलीस हवालदार दिपक खांडेकर, पोलीस शिपाई शैलेश दमाहे यांनी केली आहे. मोटारसायकल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी नागपूर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यातून त्याने मोटार सायकली चोरलेल्या आहेत. चोरलेल्या मोटारसायकल तो वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवत होता. या चोरी केलेल्या दुचाकी काही विना क्रमांकाच्या तर काहींना नंबरच नसल्याचे लक्षात आले. पुढील तपास सुरु आहे.