अवैध रेती उत्खननाचा पुन्हा एक बळी
ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
चिमूर, 21 डिसेंबर
जंगल परिसरातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवार, 21 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास मुरपार-पिट्टीचुआ मार्गावर घडली. आकाश सोनटक्के (रा. नवेगाव, रामदेगी) असे मृतकाचे नाव आहे.
तालुक्यात रेती तस्करांची मुजोरी वाढली असून, मोठ्या प्रमाणात गावानजीक तथा जंगल क्षेत्रातील नदी नाल्यातून रेती तस्करी केल्या जात आहे. मुरपार-पिट्टीचुआ मार्गावरून खडसंगी येथे येणार्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रालीवर मृतक चालकाच्या बाजुला बसून होता. अवैध रेती वाहतुकीच्या जादा फेर्या करण्याच्या नादात ट्रॅक्टर भरधाव चालवित असताना अचानक आकाश ट्रॅक्टरवरून खाली पडला आणि चाकात आल्याने त्याचा मृृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, पोलिस कर्मचार्यासह घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पोलिसांनी रेती तस्करीचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. मृतक हा लकवाग्रस्त वडील व आईचा एकुलता एक आधार होता.
आकाशच्या मृत्युने त्यांच्यावर दुखःचे आभाळ कोसळले आहे. पुढील कार्यवाही चिमूर पोलिस करीत आहेत.