विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू
•सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना
मीडिया वार्ता वृत्तसेवा
सिंदेवाही : 21 डिसेंबर
विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणार्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटातल्या मेंढामाल शेतशिवारात गुरूवार, 21 डिसेंबर रोजी उघडकीस आली. मृत वाघ अडीच ते तीन वर्षाचा असून, तो नर आहे.
मेंढामाल शेतशिवारातील शेतकरी गुरूवारी सकाळच्या सुमारास शेताकडे गेले असता, त्यांना वाघ मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती शेतकर्यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, वन्यजीवप्रेमी यश कायरकर, बंडू धोतरे, विवेक करंबेकर, पंकज माकोडे आदींची उपस्थिती होती.
पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी उत्तरीय तपासणी केली. शेतात जीवंत विद्युत प्रवाह सोडणार्या आरोपीचा शोध वनविभागाची चमू घेत आहे. सध्या अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.