संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची वेळ आली आहे
नुकताच २६ नोव्हेंबरला संपूर्ण देशात संविधान दीन साजरा करण्यात आला. संविधान दिनानमित्त संपूर्ण देशात संविधानाचा जागर करण्यात आला. ठिकठिकाणी विविध उपक्रमांद्वारे संविधानाचे महत्व अधोरेखित करणारे कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात आले मात्र संविधान दीन हा फक्त एक दिवसाचा सोहळा ठरता कामा नये. वास्तविक संपूर्ण वर्षभर संविधानाचा जागर व्हायला हवा. दौंड मधील ‘आम्ही भारताचे लोक’ हा खुला मंच जनतेच्या हिताचा सुखाचा त्यांच्या जीवन कल्याण विचार मांडणारा आणि हा विचार समग्र जनते पर्यंत पोहचवण्याचे उदिष्ट ठेवून वर्षभर म्हणजे वर्षातील ३६५ दिवस संविधानाचा जागर करते. संविधानाच्या एका कलमावर दररोज विस्तृत चर्चा केली जाते. संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम हा मंच करतो. . आम्ही भारताचे लोक या खुल्या मंचाच्या या कार्याचे खरोखरच कौतुक व्हायला हवे. आम्ही भारताचे लोक सारख्या वर्षभर संविधानाचा जागर करणाऱ्या संस्था अतिशय कमी आहेत म्हणूनच नागरिकांमध्ये संविधानाबाबत अद्यापही म्हणावी तशी जागृती होऊ शकली नाही.
संविधान लागू होऊन आज ७३ वर्ष उलटली तरी नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार माहीत नाहीत म्हणूनच संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची वेळ आली आहे. संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करावा ही खूप जुनी मागणी आहे मात्र त्याला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नाही म्हणायला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांकाचा,( क्रेडिट कोर्स) शिकवला जात आहे मात्र हा कोर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्यामानाने खूप कमी आहे म्हणूनच संविधान हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. आज आपल्या देशात लाखो विद्यार्थी पदवीधर होतात पण आपल्या संविधानाचा अभ्यास अतिशय कमी विद्यार्थ्यांना असतो. उच्च शिक्षित असूनही संविधानाची जुजबी माहितीही विद्यार्थ्यांना नसते. शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय शिकवला जातो तो पण त्रोटक स्वरूपात शिकवला जातो त्यात संविधानाची माहिती नसते. स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचे कार्य – अधिकार, निवडणूक, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, लोक्रतिनिधींनिंची जबाबदारी, अधिकार अशा स्वरूपाचीच माहिती नागरिकशास्त्रात पाहायला मिळते त्यामुळे संविधानाबाबत उच्च शिक्षित विद्यार्थी अज्ञानीच असतात. त्यांचे हे अज्ञान दूर होण्यासाठी संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे आहे.
भारतीय संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, अधिकार यांचा समावेश आहेच पण देशाचा आदर्श कारभार कसा करावा याचेही नियम आहेत. समता, बंधुता यांचीही शिकवण संविधानात आहे. संविधानामुळेच देश अखंड आहे. संविधान हा लोकशाहीचा पाया आहे. संविधान हा आपल्या जीवनाचा अविभज्य घटक आहे. संविधान आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. भारताचे संविधान शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले तर राज्याच्या आणि राष्ट्राच्या उभारणीत ते योग्य दिशेने आपापल्या क्षेत्रात कार्य करू शकतील म्हणूनच हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे ही काळाची गरज आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५