नागोठणे पोलीस ठाणे नवीन प्रशासकीय इमारतीचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न
पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा– पालकमंत्री उदय सामंत
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड,:- रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाणेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते आज झाले. पोलिसांविषयी जनतेच्या मनात आदरयुक्त भिती आहे. याप्रमाणेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करा, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.नागोठणे येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, रायगड पोलीस विभागाने ड्रग्ज पकडण्याची केलेली कामागिरी कौतुकास्पद असून यासाठी रायगड पोलिसांचे विशेष अभिनंदन करतो. समाजातील वाईट प्रवृत्तीबाबत पोलीस आणि नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे, समाजातील ड्रग्ज आणि सावकारी समूळ नष्ट झाले पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाणे इमारतीसाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्यांचे स्वागत प्रेमाने आणि आपुलकीने करा. सर्वांशी सुसंवाद साधा असे निर्देशही पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिले. भौगोलिक विविधता असलेल्या रायगड जिल्ह्याला वेगळे महत्व आहे. त्यामुळे पोलिसांनी आपली परंपरा आणि कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचे पालन करावे. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनं स्मार्ट व्हावेत, यासाठी आवश्यकते प्रमाणे कार्यवाही करा. राज्यातील पोलीस बँड पथके उत्कृष्ट आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आगामी दोन महिन्यात महाराष्ट्र पोलीस बँड वादन स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.यावेळी आ.अनिकेत तटकरे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले तर आभार अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मानले.