दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली “गोडसे ज्ञानशाळा” पोलिसांनी केली बंद; पोस्टर्स, साहित्य करण्यात आलं जप्त.

ग्वाल्हेर;- महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे नावाने ज्ञानशाळा उघडण्याची घटना घडली. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे गोडसे ज्ञानशाळेचं उद्धाटन करण्यात आलं. या ज्ञानशाळेत गोडसे यांची विचारधारा युवकांना शिकवण्यात येणार होती. गोडसे ज्ञानशाळेत नथुराम गोडसे यांच्या नावाने जयजयकार करण्यात आला. तसेच उद्धाटनावेळी उपस्थित पाहुण्यांनी नथुराम गोडसेच्या देशभक्तीबद्दलचे किस्से लोकांना सांगितले. मात्र याता दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली ‘गोडसे ज्ञानशाळा’ बंद करण्यात आली आहे. ज्ञानशाळेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करत मंगळवारी ही गोडसे ज्ञानशाळा बंद केली आहे. हिंदू महासभेने दौलतगंज स्थित आपल्या कार्यालयात ‘गोडसे ज्ञानशाळा’ सुरू केली होती. सोशल मीडियावर याला जोरदार विरोध केला जात होता. याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच या भागात कलम 144 लागू करून कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ न देण्याचे निर्देश दिले. प्रशासनाकडून हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर हिंदू गोडसे ज्ञानशाळा बंद केल्याची माहिती मिळत आहे.

साहित्य, पोस्टर्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी “हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की हिंदू महासभा भवन दौलतगंज ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रभक्तांसाठी प्रेरणास्रोत आयोजन सुरू राहतील. गोडसे ज्ञानशाळा संचालित केली जाणार नाही” असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. नथुराम गोडसे यांच्यासोबत अनेक महापुरुषांचे फोटोदेखील जोडण्यात आले, ग्वाल्हेरच्या दौलतगंज परिसरात हिंदू महासभेच्या कार्यालयात ही कार्यशाळा सुरू करण्यात आली होती.

हिंदू महासभेने नथुराम गोडसेसोबत महाराणा प्रताप, महाराणी लक्ष्मीबाई, गुरू गोबिंद सिंह आणि लाला लजपत राय यांच्या प्रतिमाही लावल्या होत्या. मध्य प्रदेश आणि नथुराम गोडसे वादाचं सत्र अनेक वर्षापासून सुरू आहे, हिंदू महासभा ग्वाल्हेरमध्ये दरवर्षी नथुराम गोडसे जयंती साजरी करते, दोन वर्षापूर्वी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी गोडसेला देशभक्त बोलल्याने वाद झाला होता, त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना संसदेत माफी मागावी लागली होती. यावेळी हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी या देशाचे कुणीही विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू महासभा त्याला प्रखरतेने विरोध करेल, ठोस उत्तर देईल, इतकचं नाही तर हिंदू महासभेकडून पुन्हा एकदा नथुराम गोडसे निर्माण करण्यात येईल असं म्हटलं होतं.

30 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या केली होती.

नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी दिल्लीतील बिडला हाऊस येथे महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती, त्यावेळी महात्मा गांधी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते, गोडसे त्यांच्या जवळ आला आणि जवळून महात्मा गांधींवर 3 गोळ्या झाडल्या. त्यात जागीच महात्मा गांधींचा मृत्यू झाला. त्यानंतर 15 नोव्हेंबर 1949 रोजी नथुराम गोडसेला अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here