अवघे इंदापूर झाले भगवेमय ! हजारो राम भक्तांनी घेतला शोभायात्रेत सहभाग.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव : माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचन्द्र प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. दुपारी ३.३० वाजता श्री. हनुमान मंदिर वरचे इंदापूर येथून काळभैरव मंदिर तळाशेत – तळाशेत चौक – समर्थ नगर रोड, ग्रुप ग्रामपंचायत तळाशेत अशी भव्य रॅली काढण्यात आली. तळाशेत – इंदापूर पंचक्रोशी व श्री रामसेवक मंडळ यांनी उत्तम आयोजन केलेले पाहायला मिळाले. भगवे ध्वज, DJ च्या तालावर प्रभू श्री रामचंद्रांच्या गाण्यांवर एकच ताल धरून महिला बाल वृध्द यांनी ठेका धरला होता. आम्ही माणगावकर ढोल ताशा पथक, तसेच खालू बाजा देखील यावेळी होता. खालू बाजाच्या तालावर महिलांनी लेझिम खेळताना आनंद घेतला.
भजन बोलत वारकरी देखील शोभा यात्रेत सहभागी झाले होते. प्रभू श्री रामांची प्रतिमा पालखीत घेऊन पालखी संपूर्ण इंदापूरमध्ये फिरविण्यात आली. तसेच रामरथ देखील काढण्यात आला होता बाल गोपाळांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची रूप घेतली होती. श्री. हनुमान व गणेश मंदिर तळाशेत येथे महाआरतीने समारोप करण्यात आला. अवघे इंदापूर शहर यावेळी भगवेमय झाले होते. हजारो राम भक्तांनी जय श्री. रामांचा नारा देत भक्तीमय वातावरणात अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेचा आनंद साजरा केला. जवळपास ३५००-४००० रामभक्त या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.