8.39 लाखांचा माल चोरी करून चोर पसार झाला.
त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नागपूर :- चोरांनी एका बंद घराचे कुलूप तोडून 8.39 लाख रुपयांच्या मालावर डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांनी शशिकला कवडू मेश्राम (55) रा. विनोबा भावेनगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.शशिकला यांचे पती कवडू एमएसईबीतून निवृत्त झाले आहेत. मेश्राम कुटुंबाची उमरेड येथे शेती आहे. लहान मुलीचे लग्न व्हायचे आहे, तर मोठी मुलगी प्रसुतीसाठी माहेरी आली होती. शशिकला यांचा मोठा मुलगा उमरेड पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. गुरुवारी मेश्राम कुटुंब उमरेडला गेले होते. या दरम्यान अज्ञात आरोपीने दाराचा कडी-कोंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील शशिकला आणि त्यांच्या मुलींचे 5.22 लाख रुपयांचे दागिने आणि 3.17 लाख रोकड असा एकूण 8.39 लाखांचा माल चोरी करून पसार झाला. घरी परतल्यावर मेश्राम कुटुंबाला चोरी झाल्याचे समजले आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. यशोधरानगर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. चौकशीत शशिकला यांनी शेतीच्या कामासाठी रोकड घरी आणून ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.