मोटरसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने पकडून केली कारवाई
चोरट्याकडून पथकाने चोरलेली मोटरसायकल केली जप्त
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा / गोंदिया📱 मो.नं.9373472847📞
गोंदिया : मोटारसायकल चोरी करून तिला विकण्यासाठी फिरत असलेल्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदियातील कुडवा येथे पकडले. १६ जानेवारी २०२४ रोजी ही कारवाई करण्यात आली असून, या चोरट्याकडून पथकाने चोरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार राजेंद्र मिश्रा, सहायक फौजदार अर्जुन कावळे, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, विठ्ठल ठाकरे व शिपाई हंसराज भांडारकर हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक तरुण चोरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एम ७७०४ घेऊन तिला विकण्यासाठी फिरत असल्याची गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली. यावर पथकाने कुडवा नाका परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मोटारसायकलवर मिळून आला.
पथकाने आपल्या पद्धतीने त्याची विचारपूस केली असता त्याने गौरव अनिल कावळे वय २२ वर्षे,रा.कुडवा असे नाव सांगितले. तसेच कुडवा येथील शारदा चौकातून १५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. पथकाने रामनगर पोलिसांत चौकशी केली असता भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. यावर पथकाने गौरव कावळे याला ताब्यात घेतले असून, मोटारसायकल जप्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे.