माथेरान मध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प विरोधात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपोषणाचा इशारा
✒️ संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333
माथेरान:- माथेरान या पर्यटन स्थळी शासनाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम नियमानुसार करण्यात यावे या मागणी साठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपोषणाचा इशारा देणारा अर्ज पक्षाचे वतीने देण्यात आला. पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे शहर प्रमुख कुलदीप जाधव यांनी पत्र दिले आहे.
माथेरान शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने जवळपास ४७ कोटींचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला आहे.पण या प्रकल्पाचे काम घाई गडबडीत आणि नियोजन शून्यतेने चालू आहे असे आम्हांस व माथेरान मधील जनतेस दृष्टीस पडत आहे.सांडपाणी प्रकल्पाचे काम हें ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या आणि विद्युत केबल अगोदरच जमिनी खालून गेल्या आहेत, अगदी त्याच बाजूने व लगतच टाकल्या गेल्या आहेत. दर १० फूट अंतरावर सर्व वाहिन्या एकत्रित असलेले चेम्बर्स भर रस्त्यातच बांधण्यात आले आहेत. आगामी काळात येथील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असून जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार तात्काळ थांबवायला हवा. माथेरानमध्ये खोदकाम करायला परवानगी नसताना, तीन वर्षांपूर्वी तयार केलेले पेव्हर ब्लॉकचे रस्ते सुद्धा खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे आणि मातीमुळे स्थानिक व पर्यटक हैराण झाले आहेत. तेव्हा यापुढे पेव्हर ब्लॉकचे रस्ते खोदण्याचे तात्काळ थांबविण्यात यावेत आणि खोदलेले पेव्हर ब्लॉकचे रस्ते तात्काळ पेव्हर ब्लॉक लावून पूर्ववत करावेत. जून महिन्यापासून माथेरानला सुरु होणाऱ्या आगामी पावसाळ्यात होणाऱ्या प्रचंड पर्जन्यवृष्टीने हें रस्ते अजून उखडले जाऊन खड्डेमय होण्याची दाट शक्यता आहे.तसेच सांडपाण्याची पाईप लाईन पेव्हर ब्लॉक चे रस्ते खोदून भर रस्त्यातून टाकणे तात्काळ थांबवावे. त्यापेक्षा रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराखालून सांडपाणी प्रकल्पा ची पाईप लाईन टाकण्यात यावी, की जेणेकरून गटाराची सुद्धा कामे पूर्णत्वास जातील. आगामी काळात जलवाहिन्या लिकेज झाल्यास पुन्हा रस्ता खोदण्याची गरज भासणार नाही. आणि एकत्रित असलेल्या दोन्ही पाईप लाईन फुटण्याचा धोका संभवणार नाही. प्रत्येक नाक्यावर किंवा दर अर्धा किलोमीटर अंतरावर किमान एक फूट रुंद व्यासाची मोरी रस्त्याच्या खालून बांधण्यात यावी की जेणेकरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नळ, केबल, विद्युत जोडण्या खोदकामा शिवाय विनासायास व कमी खर्चात आगामी काळात जोडता येऊ शकतील.सांडपाणी प्रकल्पासाठी वापरला जाणारा स्पायरल पाईप याचा व्यास हा फक्त सहा इंच असून मैला वाहून नेण्यास सक्षम आहे का? तसेच आय एस आय स्टॅंडर्ड चा दिसत नसून तकलादू व याच्या स्पायरल ठिकाणी भोके पडलेली अनेकांना निदर्शनास आली आहेत. तेव्हा हें पाईप टाकणे तात्काळ थांबविण्यात यावेत.
रहिवाशी विभागात चुकीच्या भौगोलिक ठिकाणी आणि रहिवाशी परिसराच्या अगदी जवळच हा प्रकल्प उभारू नये. तत्पूर्वी तेथील रहिवाशी यांची मते, आरोग्याचे हित लक्षात घ्यावे. गृरूत्वाकर्षणाच्या दिशेने या सांडपाण्याचा निचरा योग्य ठिकाणी होईल आणि रहिवाश्यांना कोणताही त्रास होणार नाही,अशी भौगोलिक जागा निवडण्यात यावी.अन्यथा यास स्थानिकांचा तीव्र विरोध असेल. तेव्हा माथेरान मधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम हे पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या व विद्युत केबल लगतच नियोजन शून्यतेने,चुकीचे आणि नियमानुसार होत नसल्याने त्याला स्थानिकांचा तीव्र विरोध होत असून आगामी पिढीच्या आरोग्याशी खेळ करणारा, माथेरान हें पर्यटनस्थळ खिळखिळे करणारा येथील सांडपाणी प्रकल्प बांधण्याचे चुकीचे काम तातडीने थांबवून वरील प्रमाणे सुचविलेले अन्य सोयीस्कर पर्याय निवडावेत अन्यथा येथील राजकीय पक्ष, जनता, रहिवाशी व ज्येष्ठ नागरिक सुद्धा नाईलाजाने आगामी काळात रस्त्यावर उतरल्या शिवाय रहाणार नाही असा इशारा दिला,त्यावेळी शहर प्रमुख कुलदीप जाधव यांच्यासह पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते रत्नदीप प्रधान,शहर उप प्रमुख सागर पाटील आदी उपस्थित होते.