विवाहितेची हत्या की आत्महत्या? दोन दिवसात दुसरी घटना

53
विवाहितेची हत्या की आत्महत्या? दोन दिवसात दुसरी घटना

विवाहितेची हत्या की आत्महत्या? दोन दिवसात दुसरी घटना

विवाहितेची हत्या की आत्महत्या? दोन दिवसात दुसरी घटना

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

कर्जत :- कर्जत तालुक्यातील पादिर वाडी येथील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह चाफेवाडी येथील विहिरीत आढळून आला आहे. तीन दिवसांपासून हरवलेल्या महिलेचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरील विहिरीत आढळून आल्याने पोलिसांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. दरम्यान, 27 फेब्रुवारीनंतर दोन दिवसांनी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

खांडस ग्रामपंचायतीमधील पादिरवाडी येथील सचिन झुगरे यांची २२ वर्षीय पत्नी ललिता ही २६ फेब्रुवारी रोजी रात्री घरातून निघून गेली होती. किरकोळ भांडणामुळे घरातून निघून गेलेल्या ललिता झुगरे यांचा शोध लागत नसल्याने माहेरच्या मंडळींकडून नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट येथे मुलगी हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी कळंब बोरीचीवाडी येथील ललिता यांचे आईवडील आणि नातेवाईक यांच्याकडून शोध घेण्यात येत होता. आज २९ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खांडस ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी येथील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह दिसून आला.

नेरळ पोलिसठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व टीम ने तेथे जाऊन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विहिरीमधून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो मृतदेह २६ फेब्रुवारीपासून घरातून हरवलेल्या ललिता झुगरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शेवटी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. संबंधित महिला राहात असलेली आदिवासीवाडी पादीरवाडी येथील घर आणि चाफेवाडी येथील विहीर हे अंतर तीन किलोमीटर असल्याने त्या विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे या घटनेचा अधिक तपास करीत असून, आजच रात्रीपर्यंत गुन्हा दाखल होईल, अशी माहिती नेरळ पोलीस ठाणे यांच्याकडून देण्यात आली आहे.

विवाहितेची हत्या की आत्महत्या? दोन दिवसात दुसरी घटना
तर दोन दिवसातील हि दुसरी घटना आहे कारण
२७ फेब्रुवारी रोजी कर्जत कोंदिवडे रस्त्यावर नेवाळी येथील आदिवासी कातकरी समाजातील विवाहित महिलेचा खून तिच्या पतीने केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना खांडसजवळील चाफेवाडी येथील विहिरीमध्ये आदिवासी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तिचादेखील मृत्यू संशयास्पद असल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.