मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातर्गत उणेगाव शाळेला मिळाला माणगाव तालुक्यातून दुसऱ्या क्रमांक
किरण शिंदे
लोणेरे विभाग प्रतिनिधी
8237609655
लोणेरे :- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत झालेल्या मूल्यांकनात रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उणेगाव या शाळेने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ हे अभियान मोठया प्रमाणावर यशस्वी झाले असून यात माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या . या सर्व शाळांचे निकषानुसार केंद्रस्तर व तालुकास्तरावर मुल्यांकन करण्यात आले .
या अभियानाच्या माध्यमातून शाळेत विविध प्रकारचे विद्यार्थी गुणवत्ता विकासाचे उपक्रम, शाळा व्यवस्थापन समितीचा शाळा विकासात सक्रीय सहभाग, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम, स्वयंसेवी संस्थांचा व समाजाचा शाळा विकासात सक्रीय सहभाग घेऊन शाळेच्या विकासाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. याचे मुल्यांकन माणगाव तालुक्याचे कार्यतत्पर गटविकास अधिकारी प्रमोद जठार यांच्या नेतृत्वातील पथकाने केले.
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उणेगाव ही शाळा विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत व भौतिक सुविधेच्या बाबतीत माणगाव तालुक्यात अग्रेसर आहे. शाळेतील वातावरण प्रसन्न आहे.
ही शाळा केवळ गुणवत्ताच नाही तर सामाजिक बांधिलकीही जपते . उणेगाव शाळा महाड येथील ‘शृंखला’ या संस्थेबरोबर प्लास्टिक री-सायकलिंग साठी काम करत आहे. गावातील प्लास्टिक गोळा करून री-सायकलिंगसाठी या संस्थेकडे पाठविले जाते . यातही प्लास्टिक संकलनात शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
ही शाळा यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत असतांना स्वदेस फाऊंडेशन, रोटरी क्लब गोरेगाव, आई कनकाई सामजिक संस्था होडगाव, शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत उणेगाव, ग्रामस्थ व पालक या सर्वांचा मदतीचा हात अत्यंत मोलाचा ठरला.
हे यश मिळवण्यासाठी गोरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी कुमार खामकर , गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत गावडे ,सहशिक्षक सुर्यभान शिरसाट, मुकेश भोस्तेकर व अमोल हांगे यांचे टीम वर्क अत्यंत चांगले आहे. या यशाबद्दल शाळेचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.