गोंदियात तलवारीने वार करीत एकाची हत्या; चार आरोपींना अटक.

52

गोंदियात तलवारीने वार करीत एकाची हत्या; चार आरोपींना अटक.

गोंदिया :- गोंदिया शहरात तलवारीने वार करीत एकाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडालीय. शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सहयोग रुग्णालयाच्या परिसरात 14 जानेवारीच्या रात्री 11 वाजताच्यादरम्यान ही घटना घडलीय. काही अज्ञात आरोपींनी रुग्णालयात आलेल्या 34 वर्षीय रविप्रसाद बंबारे या तरुणावर रुग्णालयाच्या प्रांगणात तलवारीने वार करीत त्यांची निर्घृण हत्या केली आणि पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय.

35 वर्षीय श्याम चाचेरे, 33 वर्षीय शुभम परदेशी, 40 वर्षीय प्रशांत भालेराव आणि 25 वर्षीय शाहरुख शेख यांना अटक करण्यात आलीय. आरोपी आणि मृताचा रेती विक्रीचा व्यवसाय होता, त्यातूनच दोघांमध्ये पैशाच्या हिशेबावरून वाद निर्माण झाले. तसेच ते वाद विकोपाला गेल्याने आरोपीने रविप्रसादची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिलीय.

ग्रामपंचायत वादातून भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या

औरंगाबाद येथेही ग्रामपंचायत वादातून भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून या गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना पकडलं जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तापले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात ही घटना घडली होती. हरिसिंग गुशिंगे असं या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. काल शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास गुशिंगे यांची हत्या झाली होती. दिवसभर मतदान होतं. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मतदानाच्या धामधुमीत व्यस्त होते. संध्याकाळी थोडी उसंत मिळाल्याने सर्वजण घरी आले होते. मात्र रात्री 10 नंतर गुशिंगे यांच्या हत्येची बातमी आल्यानंतर गावकरी एकदम हादरून गेले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी गुशिंगे यांच्या घराकडे धाव घेतली होती. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गुशिंगे यांची हत्या केल्याचं गावकऱ्यांना समजलं. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं एकच वातावरण तयार झालं होतं.