पूर्व विदर्भात राजकीय पक्षाची मोठी कसरत !
पहिल्या टप्प्यातील मतदानाचा नारळ विदर्भापासून फुटणार, पाच जिल्ह्यांचा समावेश
पहिल्या टप्य्यातील जागांवर उमेदवारी निश्चित नाही.
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847
भंडारा : १९ एप्रिल रोजी राज्यात पहिला टप्प्यातील मतदानाचा नारळ विदर्भापासून फुटणार असून यात पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय कमी वेळ असल्याने राजकीय पक्षाना मोठी कसरत करावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखांचे बिगुल अखेर आज फुंकण्यात आले आहे. यात देशात ७ टप्प्यात, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. प्रामुख्याने या लोकसभा निवडणुकांची सुरुवात ही विदर्भापासून होत आहे. १९ एप्रिल रोजी राज्यात पहिला टप्प्यातील मतदानाचा नारळ फुटणार असून यात पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्वच राजकीय पक्षाना राजकीय गणिते जुळवण्यासाठी अतिशय कमी वेळ मिळणार आहे. एकंदरीत या पाच मतदारसंघात महायुतीमध्ये केवळ दोन तर महाविकास आघाडीचा अद्यापही एकही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीला आता मोठी कसरत या पाच मतदारसंघासाठी करावी लागणार आहे.
*पूर्व विदर्भात राजकीय पक्षाची मोठी कसरत!*
देशात १९ एप्रिल ते १ जून असे ७ टप्प्यात, तर महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची सुरुवात ही पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये येत्या १९ एप्रिलपासून होणार आहे. असे असतांना या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील अधिसूचना ही २० मार्चला जाहीर होणार आहे. तर २७ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर पक्षाना आपला उमेदवार जाहीर करून प्रचार प्रसार करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी मिळणार आहे.
एकीकडे महायुतीमध्ये केवळ दोन मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तर काही मतदारसंघातील तिढा अद्याप कायम आहे. तर मविआमध्ये अद्याप एकही उमेदवार पूर्वविदर्भात जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना जलद गतीने हालचाल करावी लागणार आहे.
*उमेदवारांप्रमाणेच मतदारांना देखील करावी लागणार प्रतीक्षा*
लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षाप्रमाणे सर्वसामान्य मतदारांना देखील निकालाची मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यात प्रामुख्याने विदर्भातील मतदारांना निकालाची सर्वाधिक वाट पहावी लागणार आहे. १९ एप्रिलला मतदान केल्यानंतर निकालासाठी ४ जून म्हणजेच जवळ जवळ ४५ दिवसांची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये उमेदवारांप्रमाणेच मतदारांचा देखील कस लागणार आहे.
*विदर्भात जागावाटपाचा तिढा अद्याप कायम*
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचे हे धक्कातंत्र अजून संपले नसून विदर्भात आणखी ४ लोकसभा मतदारसंघात असेच धक्कातंत्र देण्याच्या तयारीत केंद्रीय नेतृत्व असल्याची माहिती आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही मतदारसंघात भाजप आपलाच उमेदवार देणार आहे. यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या विद्यमान खासदारांना देखील भाजप धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमध्ये अद्याप रस्सीखेच कायम आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुती मध्ये भाजपकडे जाऊ शकते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जागा भाजपला देण्यासाठी तयार नाही. अशी देखील माहिती पुढे आली आहे. तर त्याठिकाणी शिवसेनेसाठी भाजप जागा सोडायला तयार असली तरी उमेदवार हा भाजपच्या पसंतीचा असेल. अशा पद्धतीने देखील तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.