होळी रे होळी पुरणाची पोळी..
म्हसळा तालुक्यात होळी व धुळवड सण उत्साहात साजरा.
आमच्या दाराशी हाय शिमगा..
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:- रायगडात तसेच म्हसळा तालुक्यात शिमगोत्सवाला अतिशय महत्व आहे, आली रे आली होळी आली.. होळी रे होळी पुरणाची पोळी.. असं म्हणत सर्वत्र होळीचे स्वागत केले जाते, माघ महिना संपल्यावर ऋतुंचा राजा वसंताचे आगमन होते, रानात फळा फुलांना बहर येतो, आंबा, काजु यांना मोहोर येऊन बहरात येत असताना अशा वेळेला सर्वांना वेध लागतात ते फाल्गुन पोर्णिमेचे अर्थात होळी पोर्णिमेचे. रायगड आणि संपूर्ण कोकणात होळी सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. लहान थोर महिला पुरुष आबालवृद्ध सारेच जण या आनंदोत्सवात सहभागी होतात.
होळी पौर्णिमेच्या दिवशी सारा गाव एकत्र येऊन मोठी होळी रचतात. यामध्ये घराघरातून लाकूड, फाटा, गवत, पेंडा उपयोगात नसलेल्या वस्तू, बांबू इत्यादी जमा केले जाते. जमा केलेल्या साहित्यातून मोठी होळी तयार करतात. यात सर्व गाव सहभागी होते. रात्रीच्या शुभ मुहूर्तावर घोपी होळीचे फाग म्हणतो. सारे गाव होळीभोवती फेर धरत फाग म्हणतात. ’या रं पालखीत कोण देव बसं’ हे गाणं बोलुन तेहतीस कोटी देवांना बोलावून झाल्यानंतर सुवासिनी होळीची पूजा करतात. गावपांढरीला बोलावून घोपी होळी पेटवितात. या पेटत्या जाळा भोवताली अनेकजण फेर धरतात. पेटत्या होळीत नारळ टाकण्याची प्रथाही सर्वत्र रूढ आहे. याबरोबरीने पेटत्या होळीतून नारळ काढण्याचा खेळ खेळला जातो. दहकणार्या अग्नित हात घालून नारळ काढण्याचा हा खेळ मर्दानी आहे. अनेकजण या खेळात सहभागी होतात. अर्धवट जळणारे हे नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात.म्हसळा शहरातील मानाची होळी पहिली लावण्यात येते, होळी भोवती ग्रामदैवतेची पालखी फिरुन मग ती पालखी सानेवर विराजमान होते,पुर्वजांपासुन चालत आलेली प्रथा आज देखील कायम ठेवण्यात आली आहे.अतिशय आनंदाच्या वातावरणात तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन होळी हा सण साजरा करताना दिसतात, होळीनंतर साजरी होणारी धूळवड सार्या गावातून आनंदाची उधळण असते. मुंबईतील चाकरमानी खास या दिवसात गावी येतात. अनेक गावातून या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम होतात. विविध स्पर्धा होतात. गावातील समस्या सोडविण्यासाठी गाव बैठका होतात.गावागावातून शिमग्याचा नाच काढण्याची प्रथा आज देखील कायम ठेवण्यात आली आहे.