गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो? गुढी उभारण्या मागील खरा इतिहास…..
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगांव : शिशिरातील पानझडी नंतर ऋतूचक्राने हळुवार कूस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहुल लागावी, रंग विभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचे पुष्पवैभव न्याहाळताना आंबे मोहराचा हवाहवासा वाटणारा सुगंध यावा नि नवऋतूच्या स्वागतार्थ कुठेतरी दूर कोकिळेने ”राग वसंत” गावा. सर्जनशील निसर्गाच्या रंग, रूप, गंध, नाद स्पर्शातील शालीनता म्हणजे वसंताच्या आगमनाची वर्दी.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्वउत्पत्तीच्या आदिम क्षणांचा तो साक्षीदार आहे. ब्रह्म पुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रम्हदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली. या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले. एका पौराणिक कथेनुसार मर्यादापुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परत आले त्या दिवशी अयोध्यावासी यांनी तोरण, पताका लावून, गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला त्या दिवसापासून गुढी उभारण्याची प्रथा प्रस्थापित झाली.
ऐतिहासिक संदर्भानुसार पैठण (प्रतिष्ठान) नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाने जडबोजड, पराक्रमशुन्य प्रजेत आत्मतेज फुंकून प्रोत्साहित केले व त्यांच्यात चैतन्य जागृत केले तो हा दिवस. सुमारे २ हजार वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला, तेव्हापासून मराठी कालगणनेची सुरवात झाली. सातवाहन राजाच्या राज्यातील आजच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये ”युगादी” तथा ”उगादी” या नावाने हा दिवस साजरा केला जातो. ”पडव, ”पाडवो” या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश ”पाडवा”. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला . चैत्रशुद् प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ”चैत्रपाडवा” हे गोंडस मराठी नामकरण लाभले.
आपले पूर्वज निसर्गा विषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य-चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा-अर्चा करायचे त्यातूनच या प्रतिकात्मक गुढी ची निर्मिती झाली असावी. पराक्रम ,विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांची प्रतीकात्मक पूजन म्हणजे गुढी पाडवा. साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक असावी. सांस्कृतिक दृष्टीने विचार केल्यास चैत्र महिन्यानंतर शेतकरी हा नव्या पेरणीसाठी आपले शेत शिवार तयार करीत असतो. तेव्हा शेतीची प्राथमिक कामे, शेताची साफसफाई व नवपेरणीच्या दृष्टिकोणातून कामाचे नियोजन, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्या दिवशी संपूर्ण नियोजन करीत असतात.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब, हिंग, गूळ, धने, जिरे, ओवा एकत्र करून तयार केलेल्या जीवन रसाचे सेवन केले जाते. ”वसंत” या वैभवसंपन्न ऋतुराज नंतर येणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सोसण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्याच्या हेतूने या जीवन रसाचे सेवन केले जात असावे. काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी लक्ष्मीचे म्हणजे संपत्तीची पूजन केले जाते, कुठे कुठे नवीन व्यवहाराची सुरवात गुढीपाडव्यापासून केली जाते असा हा बहुआयामीत्वाने नटलेला चैत्र पाडवा. एकूण काय तर मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्त्रोताचा हा उगम दिन. जीर्ण संपून अंकुराची रुजवात करणारा हा दिवस. चैतन्याचे प्रतीक असणारा गुढीपाडवा.
आज कालानुरूप बदलून प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपुलकीच्या शुभंकर सूचिन्हांची रांगोळी काढून संकटात सापडलेल्या शेजारी, आप्तस्वकीयांसाठी मदतीची फुलमाळ व त्यात शब्दांचा गोडवा देणारे साखर गाठी घालून द्वेष, राग, लोभ, याचे अक्षता वाहून मनामनात माणुसकीची गुढी उभारावी आणि करावा संकल्प, मृतवत झालेले समाजभान जागृत करून, विकारांवर विचारांचा विजय मिळवून, नवयुगाची सुरवात करणारा शालिवाहना प्रमाणे खंबीर तेजस्वी नेतृत्व निर्माण करण्याचा. आपले पूर्वज निसर्गा विषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य-चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा-अर्चा करायचे त्यातूनच या प्रतिकात्मक गुढीची निर्मिती झाली असावी. पराक्रम, विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांची प्रतीकात्मक पूजन म्हणजे गुढी पाडवा. साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक असावी.