तथाकथित पत्रकाराला खंडणीच्या आरोपात अटक
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर, 11 एप्रिल
सोशल मीडियावर बदनामीकारक व अश्लील मजकूर ‘व्हायरल’ करून तो मजकूर काढण्यासाठी 5 लाखाची खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ’माय चंद्रपूर’ या वेबपोर्टलचा तथाकथित पत्रकार लिमेशकुमार जंगम यास रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध भादंवी 385, 294, 506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई गुरूवार, 11 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
श्रीनिवास जंगमवार यांच्या तक्रारीवरून आरोपी लिमेशकुमार जंगम याच्याविरुद्ध 5 लाखाची खंडणी मागितल्याची व अश्लील मजकूर सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील गाडे यांनी दिली. त्याच्या मजकुरामध्ये जिल्ह्यातील सन्माननीय राजकीय व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिला होता, असेही गाडे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक आणि अश्लील मजकूर सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करून त्यांचे चरित्रहणन करणे आरोपीने सुरू केले होते. याप्रकरणी जंगम याच्यावर सर्व स्तरातून टीका झाली असून, विशेषतः महिलांनी सोशल मीडियावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, दुर्गापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीनिवास जंगमवार यांनी जंगम याला फोन करून सोशल मीडियावरील मजकूर डिलीट करण्याची विनंती केली असता, त्याने पोस्ट डिलीट करण्यासाठी 5 लाखाची खंडणी मागितली. जंगमवार यांनी थेट रामनगर पोलिस ठाणे गाठून जंगमविरुद्ध 5 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी जंगमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.