32 रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-३२ रायगड लोकसभा मतदार संघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होत आहे. १२ ते १९ एप्रिल २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत जिल्हाधिकारी रायगड तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय अलिबाग येथे नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येतील. तसेच या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत असून संपूर्ण जिल्ह्यातील २३ लाख १६ हजार ५१५ मतदारांची यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून नामनिर्देशनपत्र भरणेसाठी सर्वसाधारण सूचना करण्यासाठी दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर आवश्यक बाबीची माहिती राजकीय पक्षांची बैठक घेऊन देण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत.
ते म्हणाले, जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. आयोगाचे निर्देशानुसार 32 रायगड लोकसभा मतदार संघामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. रत्नागिरी जिल्हा मधील दापोली व गुहागर विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो त्यातील मतदारांसह मतदारसंघामध्ये एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. मतदान दिवशी मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टीग केले जाणार आहे.निवडणुकीबाबतची नियम 3 मधील नमुनाची निवडणुकीची सूचना 12 एप्रिल 2024 रोजी वर्तमान पत्रातून प्रसिध्द करण्यात येणार आहे. याची प्रसिध्दी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेसह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी. तहसील कार्यालये, रायगड, रत्नागिरी जिल्हयातील पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका व नगर पंचायत कार्यालय, सर्व ग्रामपंचायती ठिकाणी लावण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, निवडणूक पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सक्षम ॲप, आपले उमेदवार ओळखा (क्नो युवर कँडडेट ॲप),सी-विजिलॲप, बोगस व्होटर ॲप यासह तंत्रज्ञानाचा वापर करून प्रणाली कार्यरत आहेत. पोस्टल मतदारांसाठी साठी (इटीपिबियस )प्रणाली वापरताना प्रशासनाकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने कारवाई करताना जिल्ह्यात १६९१ पैकी १४०९ शस्त्रे जमा झाली असून राज्यात रायगड जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१६ गुन्हे दाखल केले आहेत. भरारी पथके (फ्लाईंग स्काड) कार्यरत झाले आहेत. व्हिडिओ निरीक्षण पथक (व्हिडिओ सर्विलंस टीम- व्हीएसटी), खर्च निरीक्षण पथक (स्टाटिक सर्विलंस टीम -एसएसटी) अशी विविध पथक स्थापन करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वेळोवळी देण्यात येईल तसेच मतदान बुथ, वोटर हेल्पलाईन विविध ॲपची माहिती दिली. मतदान प्रक्रियेबाबत माहिती व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी असलेल्या सेवासुविधाची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी दिली.