नागपूर ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 3 रुग्णांचा मृत्यु ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रॉमा केअर सेंटरमधील घटना.

नागपूर:- आग लागल्याने त्यात होळपळून 10 नवजात बालकांचा मृत्यु झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमधील अतिदक्षता विभागातील ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाल्याने 3 रुग्णांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेडिकल प्रशासनाने हे आरोप फेटाळत चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवरत्न शेंडे वय 56, रा. सिद्धार्थनगर, कोरोडी, अमोल नाहे वय 24, रा. संग्रामपूर, बुलढाणा व नरेश मून वय 63, रा. महादुला अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

ट्रॉमा केअर सेंटरला कोविड डेडिकेटेड सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले होते. अमोल नाहे या तरुणाला शुक्रवारी सकाळी, शिवरत्न शेंडे यांना शनिवारी सायंकाळी तर नरेश मून या वृद्धाला रविवारी पहाटे ट्रॉमा केअर सेंटरमधील अतिदक्षता विभाग 1 मध्ये भरती केले होते. कोरोना संशयित म्हणून तिघांवर उपचार सुरु होते. त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवले होते. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण फारच कमी होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले होते. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आयसीयु 1 मधील ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर एका मागोमाग तिघांचा मृत्यु झाला. ऑक्सिजन पुरवठा अर्ध्या तासासाठी खंडित झाल्याने त्यांचा मृत्यु झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

याबाबत मेडिकल अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सांगितले की, ट्रॉमा केअर सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा अद्ययावत प्रणालीने होतो. रविवारी पहाटे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचा कोणताही रिपोर्ट नाही. परंतु, या दरम्यान काही वेळेसाठी पुरवठा कमी जास्त झाल्याची नोंद आहे. मृत्यु झालेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर होती. एका मागे एक रुग्णाचा मृत्यु झाल्याने त्याचा संबंध ऑक्सिजन खंडित झाल्याशी लावणे चुकीचे आहे. या संदर्भात कुणाची तक्रारही प्राप्त नाही. परंतु, या घटनेची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here