जिवती तालुक्यात मलेरियाचे थैमान
जिवती ग्रामीण रुग्णालयाचे लवकर उद्घाटन करा अन्यथा आंदोलन- भूषण फुसे
मनोज गोरे जिल्हा प्रतिनिधी मो.9923358970
चंद्रपूर :- जिवती तालुक्यात मलेरिया आजाराने थैमान घातले असतांना जिवती येथे रुग्णालय उपलब्ध नसल्याने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, रुग्णांवर उपचार सुरू असून प्रकृती समाधानकारक आहे, सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी रुग्णालयात रुग्णांना भेट दिली असता, गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात मुख्य सोयीं सुविधांचा अभाव लक्षात आला, रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयात पाणी नाही आणि अस्वच्छ शौचालय आदी बाबींचा फुसे यांनी यावेळी निषेध केला.
जिवती तालुक्यातील काकबन, नगराळा, मारोतीगुडा, नानकपठार, कलीगुड्यात मागील आठवडाभरापासून मलेरियाने थैमान घातले आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या 42 च्या वर पोहोचली असून यात सर्वाधिक रुग्ण ब्रेन मलेरियाचे आढळले. सर्व रुग्णांवर गडचांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे, तरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला, बांधकाम पूर्ण झाले असूनही शासनाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडेना,
परिणामी जिवती तालुक्यातील रुग्णांना जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागत आहे, औषधसाठा व इतर उपचारा अभावी रुग्णांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालय गाठावे लागत असल्याने नाहक आर्थिक व मानसिक त्रास भोगावा लागत आहे.
गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ शौचालय व इतर सुविधा तात्काळ सुधाराव्यात तसेच जिवती ग्रामीण रुग्णालयाचे त्वरित उद्घाटन करून रुग्णांना आरोग्य सेवा पुरवावी अन्यथा जिवती वासीयांना घेऊन राज्य शासन व प्रशासना विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी दिला आहे.