पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून लावली आग,स्थिती चिंताजनक.

नागपूर :- चक्क पत्नीवर रॉकेल ओतल्यानंतर आग लावित तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. अनिल देविदास भिमटे 56 रा. गोंडेगाव कन्हान, पारशिवनी असे आरोपी पतीचे नाव आहे. तर ममता अनिल भिमटे 46 रा. न्यू येरखेडा, नवीन कामठी असे जखमी पत्नीचे नाव आहे. तिची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, पती अनिल आणि पत्नी ममता यांच्यात ताटातूट होऊन खटला सुरू आहे. खटला मागे घेण्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू होते. अनिल हा कन्हान येथील वेकोलिच्या गोंडेगाव कॉलरीमध्ये काम करतो. २२ वर्षांपूर्वी ममता आणि अनिलचे लग्न झाले होते. त्यांना 21 वर्षांचा मुलगा आणि 19 वर्षांची मुलगी आहे. दोघांचेही शिक्षण सुरू आहे. ममता आणि अनिलमध्ये नेहमी घरगुती कारणांवरून वाद होत होता. दररोजच्या भांडणाला कंटाळून ममताने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. 3 वर्षांपूर्वी ती आपल्या दोन्ही मुलांसह न्यू येरखेडा परिसरात रहायला आली. ममताने अनिल विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. ती आपली गृहस्थी चालविण्यासाठी आणि मुलांचे संगोपणासाठी खावटी मागत होती. यामुळे अनिल चिढलेला होता. अनिल 15 जानेवारीला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ममताच्या घरी आला. न्यायालयीन खटला मागे घेण्यास सांगितले. ममताने खटला मागे घेण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. चिढून अनिलने ममताच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. आरडा-ओरड झाल्याने शेजा-यांना घटनेबाबत समजले. ममताला उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. शनिवारी ममताने पोलिसांना दिलेल्या बयाणात संपूर्ण घटनाक्रम सांगितला. या आधारावर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.