उद्धव ठाकरे यांना पक्षातील निष्ठावंत नेते व कार्यकर्ते यांची किंमत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या पक्षात मालक व नोकर अशी परिस्थिती म्हणून कार्यकर्ते पक्षाला सोडून जात आहेत
ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो.८६६८४१३९४६
नाशिक : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष व सध्याचे जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी व ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.
विजय करंजकर यांचा पक्षप्रवेश हा इतर पक्ष प्रवेशा पेक्षा खूप मोठा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे येत्या निवडणुकीत मोठा विजय संपादित करेल असा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणूक प्रचार आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाले. यावेळी विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते विश्वासाने शिंदे गटात आले आहेत. त्यांना कोणीही खोक्याचे आश्वासन दिलेले नाही. मात्र हे सर्व उद्धव ठाकरे यांना समजणार नाही. कारण त्यांना कार्यकर्त्यांची किंमत नाही असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना पक्षातील निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते यांची किंमत नाही. कोणीही आपल्यापेक्षा मोठा झालेला त्यांना आवडत नाही. एखाद्याने चांगले भाषण केले तर, पुढच्या कार्यक्रमात भाषणाच्या यादीत त्याचे नाव नसते. या पक्षात सध्या मालक आणि नोकर अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून जात असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करून बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केले होते, तसेच ८२ वेळा घटना दुरुस्ती काँग्रेसनेच केली आहे, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे, भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारने २०१५ सालापासून संविधान दिन साजरा केला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथील वास्तव्य असलेल्या बंगला खरेदी करून तेथे स्मारक बांधण्यात आलं आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, चाळीस आमदार आणि तेरा खासदार माझ्याबरोबर आले आहेत. आज महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करीत आहेत. माझ्यावर विश्वास व्यक्त करीत आहेत. हे सगळ्यांना कुठलेही आमिष म्हणून नाही किंवा खोके म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून किंमत दिली जात असल्याने ते माझ्याकडे येतात. आमच्या पक्षात ‘राजा का बेटा राजा’ नव्हे तर काम करणाऱ्याला सन्मान दिला जातो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.