आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनाबाबत एनडीआरएफच्या सहभागाने प्रशिक्षण संपन्न
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे सूचनेनुसार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :–आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनाबाबत जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ) च्या सहभागाने विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण आज देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत भूस्सखलन, पूर परिस्थिती काळात करावयाच्या उपाययोजना व प्रथमोपचार, CPR पध्दत, रस्त्यावरील अपघात काळात करावयाच्या उपाययोजना व प्रथमोपचार, वायूगळती आपत्तीवर उपाययोजना या विषयावर प्रात्यक्षिक करण्यात आली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय , एन डी आर एफ पुणे, तहसिलदार कार्यालय पनवेल व सी.के.टी.महाविदयालय यांचे संयुक्त विदयमाने आपत्तीविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यकम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पनवेल येथे आज आयोजित प्रशिक्षणासाठी तहसिलदार पनवेल विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार हे उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महेंद्र पुनिया-सिनीयर इन्स्पेक्टर व जालिंदर फुंदे-सिनियर इन्स्पेक्टर यांचे पथकाकडून प्रशिक्षण देण्यात आले. तहसिलदार श्री. विजय पाटील यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. आपत्ती निवारणामध्ये स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा याची माहिती दिली.
आपदामित्रांनी मागील वर्षात केलेल्या काम सांगताना भविष्यात येणा-या आपत्तीमध्ये स्थानिक यंत्रणा सतर्कतेने कार्यवाही करील अशी अपेक्षा व्यक्ती केली. निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार यांनी कार्यक्रमाची प्रास्तविक सादर केले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. नागरी संरक्षण दल, उरणचे श्री. म्हात्रे व त्यांचे पथक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. सदर प्रशिक्षणासाठी पनवेल व उरण तालूक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, आपदा मित्र, ग्रामसेवक, सरपंच, पोलिसपाटील, कोतवाल असे १५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास सी.के.टी. महाविदयालय प्राचार्य श्री. पाटील सर व एन.एस.एस.प्रमुख श्री. आकाश पाटील यांचे विशेष सहाकार्य लाभले.