उमटे धरणाला मिळणार नवसंजीवनी
उमटे धरण संघर्ष ग्रुप च्या प्रयत्नाला यश
अलिबाग
रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३
अलिबाग :- गाळात रुतलेल्या उमटे धरणाला उमटे धरण संघर्ष ग्रुप यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळणार आहे.त्यांना प्रशांत नाईक व चित्रलेखा पाटील याची मदत मिळत आहे.गेल्या तेरा दिवसांपासून सुरु असलेल्या गाळ काढणीला चांगला प्रतिसाद मिळत असून, हजारो ब्रास माती या धरणातून काढण्यात यश आले आहे. त्यामुळे भविष्यात मार्चनंतर उद्भवणारा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उमटे धरण 40 हजारांहून अधिक नागरिकांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुडकोलीपासून वेश्वीपर्यंतच्या 12 ग्रामपंचायत हद्दीतील 47 गावे, 30 हून अधिक वाड्यांना या पाण्याचा आधार आहे. एकेकाळी संपूर्ण शहरालादेखील या धरणातूनच पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, धरणातील गाळ काढण्यात प्रशासन उदासीन ठरले. त्याचा परिणाम या धरणात माती अधिक आणि पाणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. जानेवारीपासून हजारो नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली. चित्रलेखा पाटील यांच्या संस्थेमार्फत धरणातील गाळ काढण्याची मागणी प्रशासनाकडे केली. 17 मे रोजी परवानगी मिळाली आणि त्याच दिवसापासून गाळ काढण्यास सुरुवात केली.
कामाची जबाबदारी चित्रलेखा नृपाल पाटील आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी घेतली. गेल्या तेरा दिवसांपासून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सामाजिक बांधिलकी जपत ट्रक, पोकलेन, जेसीबीसारखी यंत्र सामुग्री वापरून धरणातील गाळ काढण्यात आला आहे. शेकडो एकर असलेल्या या जागेतून गाळ काढणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. तरीदेखील जनतेच्या हितासाठी सुडकोलीपासून ते रेवदंडापर्यंत हजारो नागरिकांना मुबलक शुद्ध पाणी मिळावे यासाठी उमटेधरण संघर्ष ग्रुप यांनी पुढाकार घेतला यास व यंत्र सांमुग्री देण्याची चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक यांनी जबाबदारी घेतली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीला सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटना व नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
कोट..
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणात चालत जाणे कठीण असतानादेखील चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक त्याठिकाणी नियमित जाऊन पाहणी करीत आहेत. तेथील समस्या जाऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे काम शासन व प्रशासनाने केले पाहिजे, ते काम सामाजिक बांधिलकीतून होत असतानादेखील त्यांचे कौतुक होत असताना दिसून येत नाही, ही मोठी शोकांतिक आहे. उमटे धरण संघर्ष ग्रुप मुळे या धरणाला नवसंजीवनी मिळणार आहे.
– अॅड. राकेश पाटील, उमटे धरण संघर्ष ग्रुप सदस्
………………….
स्थानिकांना मिळणार मुबलक पाणी – आ. जयंत पाटील
उमटे धरणामध्ये गाळ साचला आहे. हा गाळ काढण्याची मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात आली आहे. या मागणीनुसार माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सीएफटीआयच्या चित्रलेखा पाटील, संघर्ष समितीचे अॅड. राकेश पाटील आणि उमटे धरण संघर्ष गु्रप यांच्या पुढाकाराने धरणातील गाळ काढण्याचे काम गेल्या तेरा दिवसांपासून सुरु झाले आहे. गाळ काढण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. तरीदेखील दहा ते तेरा दिवसांत मोठ्या प्रमाणात धरणाचा गाळ काढण्यात यश आले आहे. प्रशांत नाईक यांच्यासह चित्रलेखा पाटील यांचेदेखील योगदान मोलाचे ठरले आहे. पावसाळा सुुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या कालावधीत गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. पुढच्या कालावधीत जास्तीत जास्त गाळ काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. चांगल्या प्रकारचे काम टीमने केले आहे. धरणामधील गाळ पाणी असतानादेखील काढण्याचा प्रयत्न पुढे राहणार आहे. त्यानुसार नियोजन केले जाणार आहे. नागाव, आक्षी, रेवदंडा या परिसरात बागायतदार आहेत. त्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. काम न करता बिल काढण्याची प्रथा आहे. ती मोडीत काढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले.
उमटे धरणाला गुरूवारी सायंकाळी आ. जयंत पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील, सतीश लोंढे, विक्रांत वार्डे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, सदस्य निखील मयेकर, अमित नारे, रवी थोरात, सुधीर पाटील, संजय पाटील, मधुकर ढेबे, उत्तम रसाळ, दिनेश रसाळ, जयवंत तांबडकर, मोहन धुमाळ, भालचंद्र ठाकूर, निनाद वारगे, देवीदास थळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चिंचोटी, बेलोशी, उमटे, रामराज आदी परिसरात ग्रामस्थ, सीएफटीआयची टीम उपस्थित होती.