अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील मान्यवरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील मान्यवरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील मान्यवरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 28 जून
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया संमिश्र असून, आपापल्या परिने त्यांनी या अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे.

कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार
विधिमंडळात मांडलेला अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि कल्याणकारी असून, राज्यातील विकासकामे व विविध योजना पुढे घेऊन जाणारा आहे. या अर्थसंकल्पातून शासनाने शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा हात देणार्‍या योजना प्रस्तावित केल्या आहेत. विशेष करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असून, देशातील ही सर्वात मोठी योजना आहे. यासोबतच पुरोगामी म्हटल्या जाणार्‍या महाराष्ट्रातील महिलांचे शिक्षण सुलभ आणि सहज व्हावे यादृष्टीने आर्थिक निकष पूर्ण करणार्‍या महिलांना शिक्षणात 100 टक्के सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णयदेखील या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. 14,700 कोटी रुपयांचे अनुदान देत 40 लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणार्‍या विजेत शंभर टक्के सूट जाहीर केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या कल्याणकारी संकल्पनेला गती प्राप्त होणार आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटवार यांनी दिली.
===
शेतकर्‍यांचे हित साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प : हंसराज अहिर
भाजप महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केलेल्या सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात राज्यातील महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग व सर्व समाजातील घटकांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला असून, हे अर्थसंकल्प दिलासादायक व राज्याच्या प्रगतीला नव्या उंचीवर नेणारे असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटले आहे.
===
घोषणांचा पाऊस असलेला अर्थसंकल्प : खा. धानोरकर
राज्य सरकारने शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा राज्यातल्या सर्व घटकांना अपयशी करणारा असा आहे. तरुण, कष्टकरी, मजूर, शेतकरी यांना या अर्थसंकल्पातून काहीही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.
===
सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा अर्थसंकल्प : आ. जोरगेवार
राज्याच्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, दुर्बल घटक, शेतकरी, विद्यार्थी, कृषी क्षेत्रातील सुधारणा, शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगार आणि पर्यावरण संरक्षण या विषयांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प राज्याला सर्वांगीण विकासाची दिशा देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
===
सर्वसमावेशक बाबींचा विचार करण्यात आला नाही : आ. अडबाले
हा अर्थसंकल्पात आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील शाळांचा विकास आणि शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कुठलीही तरतुद करण्यात आली नाही. अर्थसंकल्प सादर करताना सरकारने सर्वसमावेशक बाबींचा विचार करणे आवश्यक होते. दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली.
===
जनकल्याणाच्या विविध योजनांचा अर्थसंकल्प : डॉ. अशोक जीवतोडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अर्थसंकल्प शेतकरी, सामान्य जनता, गरीब, महिला, बेरोजगार आदींकरिता आनंद घेवून आले आहे. राज्य सरकारने महिला वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामधून केला असून, लाडकी बहिण योजना, शेतकरी वीज बिल माफ, गाव तिथे गोदाम, पाणबुडी प्रकल्प, सिंचन, स्वस्त पेट्रोल, दूधावर 5 रूपये अनुदान आदी विविध जन कल्याणकारी योजनांचा यात समावेश करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेता डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिली.
===
सर्वसामान्यांच्या पदरी घोर निराशा : आ. सुभाष धोटे
राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने येणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला आहे. मात्र, यातून सर्वसामान्य माणसाच्या पदरी घोर निराशा पडली आहे. राज्यावर 7 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाचे डोंगर उभे असताना या आधीच्या घोषणा पूर्ण केल्या नसताना आता या नवीन अवाढव्य आणि जवळजवळ फसव्या घोषणा हे सरकार कसे काय पूर्ण करणार आहेत. सर्वच घटकांना केवळ स्वप्नांचे गाजर दाखविण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी दिली.
===
केवळ गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः महेश मेंढे
राज्य सरकारने येणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला हे स्पष्ट आहे. विविध योजनांचे केवळ गाजर दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. तो कसा राबवणार याचा ताळमेळ त्यात नाही. भविष्यात सर्वसामान्य माणसाच्या पदरी घोर निराशाच पडेल, असे मत काँगे्रस नेता महेश मेंढे यांनी व्यक्त केले.
===
सर्व घटकांना चालना देणारा अर्थसंकल्प : डॉ. गुलवाडे
शेतकरी बांधवासोबतच सामाजातील महिला, युवती, युवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार व उद्योजक या सर्व घटकांना चालना देणारा स्वप्नपूर्तीचा हा अर्थसंकल्प आहे. माता, भगिनी यांना वर्षात 3 सिलेंडर योजना या महत्वपूर्ण घोषणेसह सर्व निर्णयांचे स्वागत करावे असेच आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केली.
===
राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प : पाझारे
राज्यातील सर्व घटकांचा विकास साधत महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला असून, महायुती सरकारने या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक अशा सर्वच घटकांचे हित साधले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here