वर्धा जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी 24 ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार.

57

वर्धा जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी 24 ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार.

वर्धा :- जिल्ह्यात स्थलांतरित पक्षी, पानथळे, तलाव तसेच पोल्ट्री फार्म येथे यंत्रणांनी पाळत ठेवून सतर्क राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. जिल्ह्यात राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे एकूण 105 पशुवैद्यकीय संस्था असून, त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. रोगाचा शिरकाव झाल्यास दक्षता घेण्यासाठी प्रत्येकी तीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या 24 शिघ्र कृतिदल रॅपिड रिस्पॉन्स टिम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही निर्मिती करण्यात आली आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार स्थलांतरित पक्ष्यामुळे होतो. पक्षी तलाव व लगतच्या कार्यक्षेत्रात राहत असल्याने संबंधित यंत्रणांना एव्हियन इन्फ्लूएन्झा बर्ड फ्लू रोग प्रादुर्भाव संबंधी सतर्कता बाळगण्यासाठी लघुसिंचन विभाग, वनविभाग, पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये असाधारण मृत पक्षी दिसून आल्यास त्वरित जवळच्या सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशु चिकित्सालय किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केले आहे. आहाराच्या पद्धती लक्षात घेता तसेच अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्यास या रोगाचा विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोंबडी विक्रेत्यांनी ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत होण्यासाठी मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले.