"Save Marathi, Save Marathi" Marathi language preservation and social media
"Save Marathi, Save Marathi" Marathi language preservation and social media

 “मराठी वाचवा, मराठी जगवा” मराठी भाषा जतन आणि सोशल मीडिया

गुणवंत कांबळे प्रतिनिधी

गेल्या एक दोन दशकात आपण एक गोष्ट सातत्याने ऐकली आहे, “मराठी वाचवा, मराठी जगवा”. जागतिकीकरणाच्या या युगात इंग्रजीचे प्राबल्य वाढत आहे. त्यामुळे भारतासह अनेक राष्ट्रांसमोर प्रादेशिक भाषेचे संवर्धन हा एक मोठा प्रश्न उभा आहे. त्यातच हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे या (गैर) समजातून मराठीला दुय्यम स्थान मिळत आहे, तसेच शासन स्तरावर देखील ठोस पावले उचलली जात नाहीत अशी भावना लोकांच्या मनात आहे.

बहुतांशी ही गोष्ट खरी वाटते, पण आपल्यास शाश्वती देऊ इच्छितो की कितीही काहीही घडलं तरी मराठी भाषेचे स्थान अढळ आहे आणि राहणार आहे, याला कारणही तसेच काहीसे आहे, कारण आता मराठी भाषा संवर्धनासाठी तरुण पिढी पुढे आलेली आहे. नुसतीच चर्चा करत न बसता या पिढीने नवीन तंत्रज्ञानाची कास धरून काम करत आहेत.

असेच एक नाव म्हणजे पोएम कट्टा. फक्त मराठी साठी वाहिलेलं सोशल मीडिया हँडल. इंटरनेट व सोशल मीडियाच्या आधारे, पोएम कट्टा गेली दोन वर्षे वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे काम करत आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक, शेअरचॅट या महत्वाच्या सोशल मीडिया साईटवरून ते त्यांचे चॅनेल आणि पेज चालवत आहेत.

भाषेचं चिरंतनपण तिच्या असण्यात नाही, आपल्या बोलण्यात आहे हेच जाणून मितेश वळंजू, रोहित भोसले आणि त्यांची टीम पोएम कट्टा सातत्याने काम करत आहेत. सर्वात आधी त्यांनी नवीन मराठी साहित्यिक तयार करण्यासाठी तरुण नवोदित मराठी कवींना त्यांच्या विविध मंचावरून संधी दिली. जेणेकरून छंद म्हणून या तरुणांनी जोपासलेल्या या कलेला आणि या कवींना लोकांसमोर आणता येईल. मुंबईसारख्या शहरात ओपन माईक हा प्रकार रुजवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याचे व्हिडीओज किंवा कवितांचे फोटो पोएम कट्टाच्या युट्यूब चॅनेल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर उपलब्ध आहेत. याचप्रकारे लॉकडाऊन दरम्यान त्यांनी तीन उपक्रम सुरू केले. पहिला म्हणजे फेसबुक लाईव्हद्वारे काही प्रसिद्ध व इन्स्टाग्राम लाईव्हद्वारे नवोदित मराठी कवींना कविता सादर करण्यासाठी देखील आमंत्रित केले होते.

जुलै महिन्यापासून त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. “साहित्यिक ज्ञात अज्ञात” या नावाने ते सदर चालवत आहेत. मराठी भाषा समृद्ध केलेल्या परिचित अपरिचित, म्हणजे अगदी क पासून ज्ञ पर्यंत साहित्यिकाबाबत ते दर महिन्याच्या तारखेनुसार दिनविशेष मध्ये नव नवीन साहित्यिकाबाबत त्यांच्या इन्स्टाग्राम व फेसबुक पेजवर माहिती देत असतात. याद्वारे लोकांना ओळखीच्या आणि विस्मृतीत गेलेल्या किंवा अनोळखी साहित्यिकांना प्रकाशझोतात आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे.

आतापर्यंत दोनशेहून अधिक लेख त्यांनी प्रसारित केले म्हणजेच दोनशेहून अधिक साहित्यिकांबाबत त्यांनी त्यांच्या पेजद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहचवली आहे. यात मराठी व्याकरण आणि भाषेबाबत संशोधन करणारे, कवी, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक, बालसाहित्यिक, विनोदी वाङ्मयकार, चरित्रकार, नाटककार, समीक्षक, संपादक, निसर्ग लेखक, पाक कला लेखक, विज्ञान लेखक, इतिहास संशोधक, असे सर्वच प्रकारच्या लेखकांबाबत आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल माहिती प्रकाशित केली आहे.

यासोबतच त्यांचा तिसरा उपक्रम सुरू आहे, उत्तम वाचनीय मराठी पुस्तकांच्या परिचयाचे देखील काम त्यांनी हातात घेतले आहे. यात प्रसिद्ध कादंबरी, कथासंग्रह आणि कविता संग्रहांचा समावेश आहे.

हे सगळे वाचल्यावर तुम्हालाही मराठी भाषा अबाधित आहे आणि राहील याची शंका उरली नसेल. पण यात तुमच्या सुद्धा सहभागाची अपेक्षा आहे, मराठीसाठी काम करणाऱ्या अशा व्यक्तींना तसेच माध्यमांना आपला पाठिंबा मिळत राहिला पाहिजे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here