शिवसेनेचे रायगड युवा जिल्हाप्रमुख पिंट्या ठाकूर यांना खंडणीसाठी धमकी
–रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३
अलिबाग: शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना रायगड जिल्हाप्रमुख, माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे पूत्र अमिर उर्फ पिंट्या ठाकूर यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. 25 लाखांची खंडणी न दिल्यास ठार मारण्याच्या धमकीची चिठ्ठी त्यांना पोस्टाद्वारे मिळाली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंट्या ठाकूर यांना शितोळे आळी येथील त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी (29 ऑगस्ट) दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास पोस्टमेनद्वारे चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये “पिंट्या ठाकूर मेरा नाम पी के टायर्स सुनिल कुमार है महेश टॉकीज मै चेंबुर मुंबई छोटा राजन आदमी है मुझे 25 लाख देना नही तो तुझे खत्म करूंगा पी के टायर्स सुनिल” अशी धमकी देण्यात आली आहे. ‘पी के टायर्स सुनिल कुमार’ असे नाव लिहून पिंट्या ठाकूर यांच्याकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
या चिठ्ठीचे गांभीर्य लक्षात घेत, पिंट्या ठाकूर यांनी तातडीने अलिबाग पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञातावर खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 308(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेना अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेह भुंडेरे करीत आहेत.