केलेले हे विकासकार्य आपण दिलेल्या मतरूपी आशीर्वादाचे फलीत – आ. किशोर जोरगेवार
• लोकार्पण कार्यक्रमांचा धडाका, विविध विकासकामांचे लोकार्पण
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 1 सप्टेंबर
“एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या, टोपल्या विकणाऱ्या आईच्या लेकराला आपण पाच वर्षांपूर्वी भरघोस मताधिक्य देऊन राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पाठविले. आज आपण तयार केलेली समाजभवने, अभ्यासिका लोकांच्या उपयोगासाठी लोकार्पित करत आहोत. खरं तर पाच वर्षांत शेकडो कोटी रुपयांतून झालेली ही विकासकामे, आपण मतरूपी दिलेल्या आशीर्वादाचे फलीत आहे,” असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
मागील तीन ते चार दिवसांत आमदार किशोर जोरगेवार यांनी लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यात बाबूपेठ येथील तेली समाजाच्या इमारतीचे आणि खुले रंगमंच, निर्मल नगरी येथील शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन, निर्माण नगर येथील अभ्यासिका, या कामांचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच आज रविवारी इंदिरा नगर येथील समाजभवनाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, हनुमान सेवा समितीचे अध्यक्ष परशुराम चव्हाण, उपाध्यक्ष गणेश किन्हेकर, सचिव विलास नखाते, सहसचिव शरद चुटे, कोषाध्यक्ष शामल शाहा, एकनाथ मोहितकर, हिरालाल लेनगूरे, पन्नुलाल राणा, सुधीर बोबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “आपण मला अपक्ष म्हणून निवडून पाठविले. खरं तर अपक्ष म्हणून काम करताना अनेक अडचणी होत्या, मात्र आपण दिलेले मताधिक्य प्रोत्साहनपर होते. त्यामुळेच काम करताना ऊर्जा मिळत होती, आणि याच कारणामुळे आपण अनेक मोठी कामे मतदारसंघात करू शकलो. मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठीही आपण मोठा निधी उपलब्ध करून दिला. गरीब विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा असलेल्या अभ्यासिकांमध्ये अभ्यास करता यावा, या उद्देशाने मतदारसंघात ११ अभ्यासिका तयार करण्याचा आपण संकल्प केला होता. यातील ९ अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले आहे. शासकीय ११ अभ्यासिका असणारे कदाचित हे राज्यातील पहिले शहर असणार,” असेही ते यावेळी म्हणाले.
“यासोबतच आपण समाजभवने आणि मूलभूत सोयीसुविधांवरही काम केले आहे. शहराच्या शेवटच्या भागात विकास पोहोचविण्याचा या पाच वर्षांत आपला प्रयत्न राहिला आहे. ५० वर्षे जुनी बाबूपेठ येथील रेल्वे उड्डाण पुलाची मागणी आपण पूर्ण केली आहे. काही दिवसांतच हा पूल आता नागरिकांसाठी खुला होणार आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी आपण ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. “आज चंद्रपूरच्या शेवटचा भाग असलेल्या इंदिरा नगर परिसरात आपण भवन उपलब्ध करून दिले आहे. या भागातील इतर विकासकामेही आपण पूर्ण केली आहेत. या समाजभवनाचा नागरिकांनी समाज प्रबोधनासाठी उपयोग करावा,” असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.