रामाचे चित्र असलेल्या गणेशमूर्तीला पसंती

रामाचे चित्र असलेल्या गणेशमूर्तीला पसंती

विविध रुपातील गणेशमूर्तीना मोठी मागणी.

रामाचे चित्र असलेल्या गणेशमूर्तीला पसंती
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
9420325993
अलिबाग : अयोध्येतील राम मंदिर, श्रीरामाचे चित्र अशा नानाविध प्रभावळी असलेल्या गणेशमूर्तींतील ट्रेंड यंदा दिसून येत असून, अशा मूर्तींना भक्तांकडून जास्त मागणी असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे. बाप्पाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात सुरु आहे. गणेशमूर्ती घरी आणण्याची लगबग सुरु झाली आहे.

गणरायाचे सात सप्टेंबरला आगमन होणार आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. काही खासगी, तर काही मंडळांमार्फत मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. काही ठिकाणी दीड दिवस, सात दिवस, दहा दिवस, एकवीस दिवसांसाठी बाप्पा पाहुणा म्हणून येणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या गणेशमूर्तीची मागणी भक्तांकडून असते. बाप्पामध्ये आपल्या देवदेवतांसह धार्मिक स्थळांची छबी दिसावी, यासाठी भाविक प्रयत्नशील असतात. त्यानुषंगाने मूर्तींची खरेदी करण्यात येते. गणेशभक्तांची आवड ओळखून यंदा मूर्तीकारांनी तशा मूर्ती देण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन-अडीच फुटांपर्यंतच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा अनेकांच्या घरात आयोध्या व राममंदिराची छबी असलेली गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत. बहुतांश मूर्ती बाजारात दाखल झाल्या असून, काही मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दीड फुटाच्या मूर्तीची किंमत एक हजार 700 रुपये, दोन फुटांच्या मूर्तीची किंमत दोन हजार 300 रुपये, सव्वादोन फुटांच्या मूर्तीची किंमत तीन हजार रुपये, तीन फुटांच्या मूर्तीची किंमत पाच हजार 500 रुपये, तर साडेतीन फुटांच्या मूर्तीची किंमत साडेसहा हजार रुपये इतकी आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये यंदाही वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तींच्या किमतीतदेखील वाढ करण्याची वेळ आली आहे. मात्र, ना नफा ना तोटा या भूमिकेतून ग्राहकांना मूर्ती विकली जात आहे. त्यामुळे यंदा मूर्तींच्या किमतीत पाच टक्के वाढ झाल्याची माहिती मूर्तीकारांनी दिली.

विजेअभावी सुमारे तेरा कोटींचा फटका
रेखीव, सुंदर गणेशमूर्ती मिळण्याचे रायगड जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणून पेणकडे पाहिले जाते. पेणच्या गणेशमूर्तींना रायगडसह वेगवेगळ्या जिल्ह्यात, राज्यात, देश-विदेशात मागणी आहे. त्यामुळे या परिसरात हजारो लोकांच्या हाताला काम मिळत आहे. पेणमध्ये विशेष म्हणजे अंतोरा, हमरापूर, कळवा, जोहे, उंबरडे, धावटे, चोनखार आदी ग्रामीण भागातदेखील हा व्यवसाय तेजीत सुरु आहे. मात्र, सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याचा कारखानदारांना प्रचंड त्रास होत आहे. विजेअभावी सुमारे प्रत्येक कारखान्यातून पाचशे मूर्ती कमी तयार होत आहेत. त्यामुळे सुमारे 13 कोटींहून अधिक फटका कारखानदारांना बसत असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले आहे.
शहरासह ग्रामीण भागातदेखील मूर्तींचा कारखाना आहे. परंतु, सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. अनेकवेळा स्वतः महावितरणच्या कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी जावे लागते. विद्युत सेवा सुरळीत राहावी हा आमचा प्रयत्न आहे. विजेअभावी करोडो रुपयांचा फटका कारखानदारांना बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here