बाजारात ढोलकीविक्रेते डेरे दाखल; खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद

बाजारात ढोलकीविक्रेते डेरे दाखल; खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद

बाजारात ढोलकीविक्रेते डेरे दाखल; खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवात आरती, भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी ढोलकी विक्रत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे बाजारात ढोलकीचा नाद घुमू लागला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशातून ढोलकी विक्रेत अलिबागमध्ये आले असून, गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या आकाराच्या ढोलकीची दुकाने थाटली आहेत. याठिकाणी ग्राहकांच्या मागणी व पसंतीनुसार ढोलकी उपलब्ध आहे. मात्र, गणरायाचे आगमन सहा दिवसांवर येऊनदेखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. परंतु, गणेशोत्सव जसजसा जवळ येईल, तसतशी विक्रीत वाढ होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सवात ढोलकी वाद्याला प्रचंड महत्त्व आहे. आरती भजनासह पारंपरिक बाल्या नृत्यांसाठी ढोलकीची गरज असते. ढोलकीचा आवाज कानावर पडला की, आपोआप गणेशोत्सवाची चाहूल लागते. गणपतीच्या आरतीवेळी बहुतेक घरातून ढोलकीचा सूर ऐकायला मिळतो. तो कानावर पडला की, आरतीला रंगत भरली जाते. दीड दिवसांपासून पाच दिवस, दहा दिवस, 21 दिवस एक जल्लोष साजरा केला जातो. लहान मुलांपासून मोठी मंडळी ढोलकी घेऊन वाजविण्याबरोबरच त्या ठेक्यावर नाचण्याचे काम करतात. गणरायाचे आगमन सात सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. यानिमित्ताने भजन, आरतीसारखे धार्मिक उपक्रमांसह सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमदेखील राबविले जाणार आहे. वेगवेगळ्या मंडळांसह ग्रामीण भागात ग्रामस्थांच्यावतीनेदेखील कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु आहे. त्यामध्ये पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलकीलादेखील मागणी अधिक असते. त्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पेण, रोहा अशा अनेक बाजारात ढोलकीची दुकाने सजली आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणीदेखील ढोलकी विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत.

अलिबागमध्ये गेल्या आठ वर्षांपासून लखनऊ येथील ढोलकी विक्रेते येतात. यंदाही ते ढोलकी विक्रीसाठी दाखल झाले आहेत. ग्राहकांच्या पसंती व मागणीनुसार ढोलकी तयार करून दिली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दुकाने सजली असली, तरीसुद्धा खरेदीला अल्प प्रतिसाद असल्याचे विक्रेते शेख यांनी सांगितले आहे. मागील वर्षी 70हून अधिक ढोलक्यांची विक्री झाली होती. आधुनिक युगात ढोलकीला या कालावधीत मागणी आहे. परंतु, यंदा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. लहान ढोलकीपासून मोठ्या आकाराच्या ढोलकी बाजारात दाखल असून, दोनशे रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत ढोलकी विक्रीसाठी ठेवल्या आहेत, असे ढोलकी विक्रेत्याने सांगितले.

ढोलकी विक्रीचा व्यवसाय परंपरागत आहे. वडीलांपासून हा व्यवसाय केला जात आहे. पुर्वी पेणमध्ये दुकाने थाटले जात होते. मात्र गेल्या आठ वर्षापासून अलिबागमध्ये ढोलकी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. अद्याप खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु आज व उद्या विक्रीत वाढ होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here