'इरई' धरणाचे दोन दरवाजे उघडले

‘इरई’ धरणाचे दोन दरवाजे उघडले

'इरई' धरणाचे दोन दरवाजे उघडले

• चार तालुक्यात अतिवृष्टी
• ब्रम्हपुरी-वडसा मार्ग बंद
• सिंदेवाही, सावली तालुक्यात 62 घरांची पडझड

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 सप्टेंबर
गेल्या चोवीस तासात सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी व सावली तालुक्यात अतिवृष्टी झाली. भूती नाल्यावरून पाणी वाहत असल्याने ब्रम्हपुरी-वडसा मार्ग बंद झाला. सिंदेवाही तालुक्यात तब्बल 20 घरांची, 2 गोठ्यांची, तर सावली तालुक्यात 42 घरांची अंशतः पडझड झाली आहे. नदी-नाल्यांतील जलसाठ्यात वाढ झाली असून, इरई धरणाचे 2 दरवाजे 0.25 मिटरने उघडण्यात आले आहेत.
इरई नदी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. हवामान विभागाने संततधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गोंडपिपरी तालुका वगळता अन्य सर्वच तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ब्रम्हपुरी तालुक्यातील भूती नाल्यालगतचे शेतशिवार पाण्याखाली आहे. सिंदेवाही तालुक्यात तब्बल 106.3 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील गुंजेवाही, पवनपार, मोहाळी व नवरगाव येथे तब्बल 20 घरे व 2 गोठ्यांची पडझड झाली असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली. या तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. मात्र, सर्व मार्ग सुरू आहेत.
सावली तालुक्यात वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. या तालुक्यात गेल्या चोवीस तासात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसाने तालुक्यातील 37, तर सावली शहरात 5 घरांची पडझड झाली. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
सोयाबीन शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना मुसळधार पावसाने हजेरी लावलल्याने या पिकाला फटका बसला असून, कापूस पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार यांनी वर्तवला आहे. सद्यस्थितीत नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here