एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी, 30 जानेवारीला एल्गार परिषदेचे आयोजन.

51
पुणे:- येत्या ३० जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिलेली आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी गेल्या वर्षी 21 डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र, परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. एल्गार परिषदेला परवानगी मिळावी यासाठी कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र, करोनाचे संकट पाहता एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर जर एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली, तर आम्ही आमची एल्गार परिषद रस्त्यावर भरवू, नाहीतर मग जेलभरो आंदोलन करू असा इशारा बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. या पूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी, 1 जानेवारी 2018 या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या परिषदेचा संबंध कोरेगावच्या हिंसाचाराशी जोडला होता. मात्र, आता तीन वर्षांनंतर पुन्हा एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे आता ही परिषद 30 जानेवारी या दिवशी गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. करोना असल्यामुळे या परिषदेला 200 जणांनाच सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.