अतिवृष्टी पिडीत नागरिकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा आरोप

अतिवृष्टी पिडीत नागरिकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
– डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा आरोप

अतिवृष्टी पिडीत नागरिकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा आरोप

• पावसाळ्यात घरांची पडझड, गरजूंना सरकारकडून मदतीची प्रतीक्षा
• मूलचे संवर्ग विकास अधिकारी राठोड यांना निवेदन

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 14 सप्टेंबर
या पावसाळ्यात वरूण राजाच्या कोपाने मूल तालुक्यातील अनेक लोकांच्या घराची पडझड झाली आणि परिवारातील सदस्य लहानांपासून वयस्करांपर्यंत जीर्ण, पडझड झालेल्या, ताडपत्रीच्या घरात जीवघेण्या अश्या परिस्थितीत जगत आहेत. काही दिवसांपूर्वीच फिस्कुटी या गावात पावसाने कमकुवत झालेली भिंत कोसळून पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात सुशी, नांदगाव, भादुर्नि, डोनि, मोरवाही आणि केळझर या गावांतील नागरिकांनी गट विकास अधिकारी कार्यालय, मुल आणि थेट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर याचे कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली. संबधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

• प्रशासनाचे किचकट नियमच देत आहे दुर्दैवी घटनेला आमंत्रण

सुशी, नांदगाव, भादुर्नि, डोनि, मोरवाही आणि केळझर या गावांतील नागरिकांनी घरकुलासाठी प्रस्ताव आणि पुरावे सादर करून एक वर्ष उलटले तरीही अद्याप त्यांना घरकुले मिळालेली नाहीत. ज्यांची घरे कोसळली आहेत आणि जे सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत, त्यांनाही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी अधिकाऱ्यांना आठवण करून दिली कि, विधवा महिलांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले गेले होते, परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही. गावातील अनेक नागरिकांच्या घरांची दुरवस्था झाली असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केली.
डॉ. गावतुरे यांनी मागणी केली की, घरकुलांचे वाटप करताना केवळ यादीतील क्रमांकानुसार न जाता, ज्यांना अत्यंत गरज आहे अशा लोकांना प्राधान्य द्यावे. ज्यांच्याकडे आरसीसी किंवा पक्की घरे आहेत, अशा लाभार्थ्यांना थोडा वेळ थांबवून सर्वात गरजू लोकांना आधी घरकुले द्यावीत, असे मत व्यक्त केले जात आहे.
घरकुलांच्या निवडीबाबत देखील डॉ. गावतुरे यांनी नाराजी व्यक्त केली. उपस्थित गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या प्रशासनिक कारभारावर टीका करत, अधिकारी प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कार्यालयातून किंवा एखाद्याच्या घरातूनच निवड करतात असा आरोप केला.
या परिस्थितीत गरजू लोकांना लवकरात लवकर घरकुले मिळावी आणि त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे, अशी मागणी डॉ. गावतुरे यांनी केली.
यावेळी माजी सरपंच वर्ष आरेकर, काजू खोब्रागडे ,सीमा लोणबले, पाटील वाळके, ईश्वर लोणबले, विक्रम माहुर्ले, मनीष माहुर्ले आदुंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here