After breaking into the address club, the young man was stabbed by a chopper, and once again, a gang war broke out in Thane.
After breaking into the address club, the young man was stabbed by a chopper, and once again, a gang war broke out in Thane.

पत्त्याच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर चॉपरने सपासप वार, ठाण्यात पुन्हा एकदा गँगवॉरला ऊत.

 

ठाणे :-  ठाण्यात पुन्हा एकदा गँगवॉरला ऊत आला आहे. आपल्या विरोधात साक्ष का दिली म्हणून दोन आरोपींनी विरुद्ध गँगच्या एका सदस्यावर पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून तरुणावर चॉपरने सपासप वार करण्यात आले.

आरोपी मंदार गावडे आणि अभिषेक जाधव हे दोघे ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका पत्त्यांच्या क्लबमध्ये बसलेल्या प्रथमेश निगुडकर या तरुणाला शोधत आले. त्यानंतर तो समोर दिसताच हातातील धारदार शस्त्र चॉपरने प्रथमेश नावाच्या त्या तरुणावर सपासप वार करायला सुरुवात केली. मंदार आणि अभिषेक हे दोन्ही आरोपी प्रथमेशच्या डोक्यात, हातावर, मानेवर, छातीत आणि पोटावर दोघे धारदार शस्त्र चॉपरने वार करतच होते.

प्रथमेश आपला बचाव करत होता. मात्र, नंतर दोन्ही आरोपींनी प्रथमेशला पत्त्याच्या क्लबच्या खाली नेले आणि तेथेही त्याला मारहाण केली आणि दोघेही प्रथमेशला त्याच अवस्थेत सोडून पळून गेले. प्रथमेशवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी अभिषेक या आरोपीला पकडलं आहे.

गेल्या वर्षीच नवी मुंबईतील ऐरोली आणि ठाणे शहराच्या हद्दीवर असलेल्या गरम मसाला या हॉटेलमध्ये प्रथमेश निगुडकर हा आपल्या साथीदारांसोबत असताना तेथे मंदार गावडे आणि त्याच्या साथीदारांनी प्रथमेश निगुडकर आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला होता. यात कोणाला दुखापतही झाली नाही. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे आणि प्रथमेश त्यात साक्षीदार आहे. या खटल्यात प्रथमेशची साक्ष महत्वाची आहे. त्यामुळे प्रथमेशला शोधत मंदार आणि अभिषेक पत्त्याच्या क्लबमध्ये आले होते आणि आमच्या विरोधात तू साक्ष कशी देतो हेच पाहतो? असं बोलून आरोपींनी प्रथमेशवर वार केले.

दुसरीकडे राजकीय वरदहस्त आणि पोलिसांचे छुपे पाठबळ यामुळे सुसंस्कृत ठाण्यातील वातावरण बिघडले असून या गँगवॉरकडे ठाण्यातील तरुणाई आकर्षित होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबईतून गँगवॉर जवळपास संपुष्टात आलं असताना ठाण्यात सुरू असलेलं गॅंगवॉर शहरातील वातावरण खराब करत असून या गँगस्टर्सचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर त्याचे भीषण परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here