अलिबागच्या उमेदवारीवरून शेकापच्या पाटील कुटुंबातच वाद

162

अलिबागच्या उमेदवारीवरून शेकापच्या पाटील कुटुंबातच वाद

अलिबागच्या उमेदवारीवरून शेकापच्या पाटील कुटुंबातच वाद

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:विधानसभा निवडणूकीसाठी अलिबागच्या उमेदवारीवरून शेतकरी कामगार पक्षात वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील हे त्यांची सून महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. तर माजी आमदार सुभाष उर्फ पंडीत पाटील हे पून्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दोन गट पडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. यावर तोडगा निघाला नाही तर पक्षासमोरील अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

अलिबागच्या उमेदवारीवरून शेकापच्या पाटील कुटुंबातच वाद

रायगड जिल्हा हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शेकापचे चार ते पाच आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून जात होते. त्यामुळे विधीमंडळात विरोधी पक्षनेते पद भूषविण्याची संधी मिळाली होती. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दि. बा पाटील, मोहन पाटील, मिनाक्षी पाटील यांनी रायगडमधून पक्षाचे नेतृत्व केले. पण गेल्या काही वर्षात डाव्या विचारांचा हा पक्ष अडचणीत येऊ लागला आहे. पक्षाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असून, जनाधार घटत चालला आहे. युत्या आघाड्यांबाबत पक्षश्रेष्ठींनी घेतलेले निर्णय चुकीचे ठरत गेल्याने पक्षाची वाताहत झाली आहे. पक्षाची ताकद सातत्याने क्षीण होत चालली आहे.

रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांनी शेकापची साथ सोडून भाजपचे कमळ हातात घेतल्याने पनवेल मधील पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले. कर्नाळा बँक घोटाळ्यात माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्याने, उरण मधील शेकापची संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली. पेण मतदारसंघातून माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपमध्ये जाऊन खासदार झाले आहेत. त्यामुळे पेण मतदारसंघातही पक्षाची वाताहत झाली आहे. महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघातून स्वबळावर उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती पक्षाची राहीलेली नाही. त्यामुळे पक्ष संघटन शिल्लक आहे असा अलिबाग हा एकमेव मतदारसंघ शेकापकडे शिल्लक राहीला आहे. मात्र या मतदारसंघातही उमेदवारी कोणाला द्यावी यावरून दोन मतप्रवाह तयार झाल्याने पक्षाची कोंडी होण्याची चिन्ह दिसू लागील आहेत.

जयंत पाटील यांची सून असलेल्या चित्रलेखा पाटील या शेकापच्य़ा महिला आघाडी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या शिवाय अलिबाग नगर परिषदेवर त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणूनही कामे केले आहे. पीएनपी एज्यूकेशन सोसायटीच्या सचिव म्हणून त्या काम पाहत आहेत. गेल्या पाच वर्षात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. शाळकरी मुलींना सायकलींचे वाटप, वयस्कर लोकांना चष्मे वाटप यासारख्या उपक्रमांचा यात समावेश होता. करोना काळात एका तात्पुरते सुश्रृषा केंद्र त्यांनी सुरु करून रुग्णांची सेवा केली होती. त्यामुळे यंदा विधानसभेसाठी अलिबाग मुरुड मतदारसंघातून त्यांनाच उमेदावरी दिली जावी यासाठी पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आग्रही आहेत.
तर दुसरीकडे जयंत पाटील यांचे धाकटे बंधू माजी आमदार सुभाष पाटील उर्फ पंडित पाटील पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्ष त्यांनी विधानसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यापुर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. जिल्हा परिषदेत विविध पदांवर दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे पक्षात त्यांना मानणारा मोठा गट आहे. प्रशासनाची उत्तम जाण त्यांना आहे. जिल्ह्याचे राजकारणावर त्यांची पकड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची संधी आपल्याच मिळावी यासाठी ते आग्रही आहेत.

त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी यावरून मतदारसंघात पक्षात दोन गट पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहेत. दोन्ही गटांकडून स्वतंत्र बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गटतटाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली आहे.

प्रत्येक कार्यकर्त्यांला पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. पण शेकाप हा शिवसेनेसारखा एकाधिकारशाहीवर चालणारा पक्ष नाही, कार्यकर्त्यांच्या मतावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते ठरवतील तोच शेकापचा उमेदवार असेल. – सुभाष पाटील, माजी आमदार शेकाप